Bilkis Bano Case: बिल्किस बानोप्रकरणातील काही दोषी ‘संस्कारी ब्राह्मण’ आहेत, त्यांना फसवलं गेलंय; भाजप आमदाराचं धक्कादायक विधान
Bilkis Bano Case : या दोषींनी फसवलं गेलं असावं. त्यांच्या कुटुंबीयांनी भूतकाळात केलेल्या कामामुळे कदाचित त्यांना फसवलं गेलं असण्याची शक्यता आहे. जेव्हा अशा दंगली होतात तेव्हा दंगलीत जे लोक नसतात त्यांचंही नावं येत असतात.
सुरत: बिल्किस बानो प्रकरणातील (Bilkis Bano Case) 11 आरोपींची शिक्षा भाजप सरकारने माफ केली आहे. गुजरातच्या (gujarat) शिक्षा माफ करणाऱ्या समितीचे एक माजी सदस्य आणि भाजपचे गुजरातचे आमदार सी. के. राऊलजी यांनी धक्कादायक विधान केलं आहे. 2002मधील गुजरात दंगलीतील या प्रकरणातील काही दोषी लोक ब्राह्मण आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबातील भूतकाळातील कर्मामुळे त्यांना या प्रकरणात फसवलं गेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं धक्कादायक विधान सी. के. राऊलजी (C.K Raulji) यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून संतापही व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच गुजरात सरकारने बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींची शिक्षा माफ केली होती. त्यामुळे 11 आरोपी शिक्षा संपण्यापूर्वीच तुरुंगातून बाहेर आले आहेत.
15 वर्षापासून तुरुंगात शिक्षा भोगलेले हे आरोपी गुन्ह्यात सहभागी होते की नाही हे मला माहीत नाही, असंही सी. के. राऊलजी यांनी म्हटलं आहे. बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावले गेलेल्या सर्व 11 दोषींना 15 ऑगस्ट रोजी गोध्राच्या तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. गुजरात सरकारच्या शिक्षा माफीच्या योजनेनुसार या आरोपींना माफी देण्यात आली होती.
कोर्टाच्या आधारेच निर्णय
एका वेब पोर्टलशी संवाद साधताना राऊलजी यांनी हे विधान केलं आहे. आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे निर्णय घेतला आहे. आम्हाला आरोपींची वर्तवणूक पाहायची होती. तसेच त्यांना वेळेच्या आधी शिक्षेतून माफी देण्याचा निर्णय घ्यायचा होता. आम्ही जेलरशी चर्चा केली. त्यावेळी या आरोपींची वर्तवणूक चांगली असल्याचं समजलं. या शिवाय काही दोषी ब्राह्मण आहेत. त्यांचे संस्कार चांगले आहेत, असं राऊलजी म्हणाले.
फक्त वर्तवणूक पाहून निर्णय घेतला
या दोषींनी फसवलं गेलं असावं. त्यांच्या कुटुंबीयांनी भूतकाळात केलेल्या कामामुळे कदाचित त्यांना फसवलं गेलं असण्याची शक्यता आहे. जेव्हा अशा दंगली होतात तेव्हा दंगलीत जे लोक नसतात त्यांचंही नावं येत असतात. पण त्यांनी गुन्हा केला होता की नाही मला माहीत नाही. आम्ही फक्त वर्तवणूक पाहून त्यांची शिक्षा माफ केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.