कायदा हातात घ्यायला लावू नका, अजितदादा गटाच्या नेत्याचा सरकारला इशारा; धनगर आरक्षणावरून वातावरण तापलं
धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आहे. आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण देण्याची धनगर समाजाने मागणी केली आहे. तर आदिवासींनी धनगर समाजाला आपल्या कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदारच या आरक्षणाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे महायुतीची चांगलीच कोंडी झाली आहे.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. धनगर समाजाला आदिवासीच्या आरक्षणातून आरक्षण देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याला आदिवासी समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. आता अजितदादा गटाचे नेते डॉ. किरण लहामटे यांनीही सरकारला या मुद्द्यावरून घरचा आहेर दिला आहे. धनगरांना आरक्षण द्या. पण आदिवासीतून देऊ नका, असं सांगतानाच आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, असा सज्जड इशाराच किरण लहामटे यांनी दिला आहे. त्यामुळे आता महायुतीतच धनगर आरक्षणावरून बेबनाव असल्याचं दिसून आलं आहे.
अजितदादा गटाचे आमदार नेते डॉ. किरण लहामटे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं तर उग्र स्वरूपाच आंदोलन केल जाईल, असा इशाराच किरण लहामटे यांनी दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यानंतर सत्तेत असलेल्या दुसऱ्या आमदाराने आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिल्याने महायुतीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
त्याचा निषेध करतो
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांचा मी निषेध करतो. आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यात आलेलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 47 जमातीला आरक्षण दिलंय आणि त्यात कोणाचाही समावेश होवू शकत नाही. कोणीही घटनेची पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायच असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही, दोन्ही समाजाची संस्कृती स्वतंत्र आहे, असंही किरण लहामटे म्हणाले.
आरक्षणाला धक्का नको
धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्याचा सरकार विचार का करत आहे? किंवा काही संघटनांना का वाटतंय आदिवासी समाजातून आरक्षण मिळावं? आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका. तसं झालं मोठं आंदोलन करू. मुंबईला जो पाणीपुरवठा होतो तो आदिवासी भागातून होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नका. धरणासाठी जमिनी आम्ही दिल्या. शोषण आमचं झालंय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलंय त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही. आरक्षण दिलं त्याची भरती देखील होत नाही. त्यात आमच्या आरक्षणात दुसऱ्याला घुसवताय हे सगळ निषेधार्ह आहे. सरकारने पुन्हा एकदा डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा, असंही लहामटे म्हणाले.
काँग्रेसची प्रतिक्रिया काय?
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या काळातही मागण्या होत्या. आमच्याकडे खोटे बोलून फसवायची अशी पद्धत नाही. भाजपने मागच्या 2014 सालच्या निवडणुकीत धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच आम्ही निर्णय करतो असे सांगितले होते. काँग्रेसला जे शक्य आहे तेच बोलते आणि करून दाखवते. भाजप किंवा त्यांचा मित्र लोकांना फसवायचं कसं आणि मतं कशी मिळवायची एवढंच पाहतात, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.