उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भडकले, म्हणाले… मोदी यांना खरा टक्का…
मराठी टक्का कमी दाखवणार याचा मराठी आरक्षणावरही परिणाम होईल. त्यामुळे ही आकडेवारी घेऊन मोदी यांच्या समोर जाऊ नका त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
मुंबई : मुंबईत येथे उभ्या राहणाऱ्या मराठी भाषा भवन इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेल्या वर्षी गुढीपाडव्याला संपन्न झाले होते. मात्र, एक वर्ष होऊनही अदयाप या इमारतीचा पक्का आराखडा तयार झालेला नाही. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेतली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते. पण, या बैठकीत आमदार चेतन तुपे यांच्या रागाचा पारा चढला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल अशा स्वरूपाची मांडणी आणि रचना असलेले मराठी भाषा भवन व्हावे अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त केली. मराठी भाषेला असलेला दोन हजार वर्षांचा इतिहास, त्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यातून मिळावी. तसेच पुढील पिढीला मराठीचे महत्व आणि थोरवी समजावी या हेतूने संकल्पित केलेले मराठी भाषा भवन ही वास्तू असली पाहिजे असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी सर्व मराठी भाषिक नागरिकांना मुंबईत आल्यावर या वास्तूला भेट द्यावी अशा पद्धतीने याची रचना झाली पाहिजे. आपल्या मातृभाषेसाठी एकत्र काम करू या, असे आवाहन केले. या बैठकीत वास्तुविशारद पी. के. दास यांनी दोन वेगवेगळे आराखडे दाखविले. मात्र, हे दोन्ही आराखडे उद्धव ठाकरे यांनी नापसंद केले.
हे आराखडे पाहून मराठी भाषा भवनाचा फील येत नाही. हे दोन्ही आराखडे एकत्र करून आणखी काही आकर्षक इमारत निर्णय करता येईल का ते पहावे. त्याला मराठी भाषा भवनाचा फील यायला हवा. मराठी भाषा भवण आणि त्याचे कार्यालय हे स्वतंत्र असावेत. सरमिसळ करू नका ते वेगवेगळे ठेवा, अशी सूचना ठाकरे यांनी या बैठकीत केली.
मातृभाषेला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घ्यावा – नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या बैठकीत बोलताना, ‘सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मराठी भाषेचे उपासक म्हणून आपण सर्वांनी मातृभाषेला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि मराठी भाषेविषयी माहिती देणारे हे दालन असले पाहिजे, असे सांगितले.
वास्तू रचनेत आवश्यक बदल करू – दीपक केसरकर
मराठी भाषा भवन निर्मितीसाठी सर्वांच्या सूचना स्वागतार्ह आहेत. या वास्तूरचनेत आवश्यक ते बदल करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. नव्याने संरचना तयार करण्याबाबत संबंधिताना देण्यात येतील असे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
आमदार चेतन तुपे भडकले
मराठी भाषा भवनाच्या वास्तूरचनेमध्ये A, B, C, D अशी अक्षर ओळख न ठेवता मराठी संतांचे अभंग कॅलिग्राफी करून ते लावण्यात यावे. आतापर्यंत दोन बैठक झाल्या आणि दोन्ही बैठकीत तेच आराखडे दाखविण्यात आले. गेल्या बैठकीत ज्या सूचना केल्या होत्या त्यावर काहीच अंमलबजावणी झालेली नाही. अजून किती दिवस वाट पहाणार आहोत असा संतप्त सवाल त्यांनी केला.
विकिपीडियावर मराठी माणसाची लोकसंख्या कमी दाखविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ही खोटी आकडेवारी दाखवणार. सुमारे अडीच कोटी लोकसंख्या कमी दाखवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवू न देण्याचा हा प्रयत्न आहे का ? मराठी टक्का कमी दाखवणार याचा मराठी आरक्षणावरही परिणाम होईल. त्यामुळे ही आकडेवारी घेऊन मोदी यांच्या समोर जाऊ नका त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.