राज्यात मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही, राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखी परिस्थिती : रवी राणा
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मला आणि खासदार नवनीत राणा दोघांनाही पोलिसांनी अटक केली", असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं (MLA Ravi Rana allegations on CM Uddhav Thackeray).
अमरावती : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात हुकूमशाही चालवली आहे. आज आणीबाणीच्या काळाची आठवण येते. शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला म्हणून तीन दिवस जेलमध्ये ठेवलं. शेतकऱ्यांनाही अटक केली. आता मुंबईत जाण्यापासून रोखलं. अशाप्रकारच्या हुकुमशाहीमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे”, असा घणाघात आमदार रवी राणा यांनी केला (MLA Ravi Rana allegations on CM Uddhav Thackeray).
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थासमोर उद्या (16 नोव्हेंबर) आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, राणा दाम्पत्य मुंबईला रवाना होण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्तालयात दाखल केले. पोलिसांच्या या कारवाईवर रवी राणा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा आवाज दडपत असल्याचा आरोप केला.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मला आणि खासदार नवनीत राणा दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी व्हॅनमधून पोलीस आयुक्तालयात आणलं. माझी रात्री आठ वाजता मुंबईची गाडी होती. पण रेल्वे स्टेशनला जाण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं”, अशी माहिती राणा यांनी दिली (MLA Ravi Rana allegations on CM Uddhav Thackeray).
“हजारो शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं, शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली, त्याबद्दल मी आवाज उचलला. पण मला तीन दिवस जेलमध्ये टाकलं. आज जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी निघालो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी ताब्यात घेतलं”, असं रवी राणा म्हणाले.
“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांविषयी आणि लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना आलेलं वाढीव वीजबिल कमी करावं, यासाठी कुणी आवाज उचलला तर त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकाल? मुंबईमध्ये जाण्यासाठी बंदी आणाल? शेतकऱ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखाल?”, असे सवाल रवी राणा यांनी केले.
“ही दडपशाही महाराष्ट्राचे शेतकरी सहन करणार नाहीत. येणाऱ्या काळात मुख्यंत्र्यांना याचा जवाब द्यावा लागले. विधानसभेत ज्या अधिकाऱ्यांनी मला अटक केली त्यांना निलंबित करण्याची मागणी करेन”, असं रवी राणा यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
‘मातोश्री’बाहेर आंदोलनाचा इशारा, राणा दाम्पत्य मुंबईच्या दिशेला रवाना होण्याआधीच पोलिसांचा घेराव
आमदार रवी राणांसह शेतकऱ्यांची कारागृहातून सुटका, सोमवारी हजारो शेतकऱ्यांसह ‘मातोश्री’वर धडक देणार!