छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा; शिंदे गटाच्या आमदाराचा तोल सुटला
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींची बाजू लावून धरली आहे. भुजबळ यांच्या या भूमिकेवर शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तर भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गायकवाड यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 1 फेब्रुवारी 2024 : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. कोणत्याही मंत्र्याची भूमिका एका समाजाच्या विरोधात राहूच शकत नाही. भुजबळ त्या मंत्रीपदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांच्या मनात जातीयवाद असेल तर ते मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना लाथ घालून मंत्रिमंडळातून हाकलून द्या, असे आवाहन संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करून मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा. एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही. असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. भुजबळांमध्ये जर जातीवाद शिरला असेल तर ते मंत्रीपदावर राहायच्या लायकीचे नाहीत. त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा हे माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन आहे, असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय.
जोडो मारो आंदोलन
दरम्यान, संजय गायकवाड यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. समता परिषदेने संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला जोडो मारत त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध नोंदवला आहे. समता परिषदेने संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी समता परिषदेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तटकरे यांनी फटकारले
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संजय गायकवाड यांना फटकारले आहे. संजय गायकवाडांचे वक्तव्य संतापजनक आहे. त्यांचे वक्तव्य चुकीची आहे. गायकवाडांना भावना मांडण्याचा अधिकार आहे. पण गायकवाडांची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी दखल घेऊन कारवाई करावी. भुजबळांची भूमिका ठाम आहे. पण आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. हे पाहावं लागेल, असं सुनील तटकरे म्हणाले.