Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या पत्रातील एक वाक्य, ज्याने मुख्यमंत्र्यांच्या भावनिक भाषणावर बोळा फिरवला; शिरसाट यांची खदखद काय?

| Updated on: Jun 23, 2022 | 1:42 PM

Sanjay Shirsat : आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्रं लिहून खदखद व्यक्त केली आहे. या पत्रातील शिरसाट यांच्या एका वाक्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावरच बोळा फिरवाल आहे.

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या पत्रातील एक वाक्य, ज्याने मुख्यमंत्र्यांच्या भावनिक भाषणावर बोळा फिरवला; शिरसाट यांची खदखद काय?
संजय शिरसाट यांच्या पत्रातील एक वाक्य, ज्याने मुख्यमंत्र्यांच्या भावनिक भाषणावर बोळा फिरवला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी काल जनतेशी ऑनालईन संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांना चर्चेसाठी समोर येण्याचं आवाहन केलं. तसेच आपण आमदारांना भेटत नव्हतो याची कबुलीही त्यांनी दिली. आजारपण आणि कोरोनाचा काळ यामुळे भेटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक आवाहनाला शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनी भावनिक पत्रं लिहून उत्तर दिलं आहे. शिरसाट यांच्या पत्रातील एका वाक्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक भाषणावर बोळा फिरवला आहे. शिरसाट यांनी आपल्या पत्रातून थेट ठाकरे यांच्या कार्यशैलीवरच बोट ठेवलं आहे. त्यांच्याच नव्हे तर अनेक आमदारांच्या मनातील खदखदच जणू त्यांनी व्यक्त केली आहे.

आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्रं लिहून खदखद व्यक्त केली आहे. या पत्रातील शिरसाट यांच्या एका वाक्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावरच बोळा फिरवाल आहे. या पत्रातून शिरसाट यांनी थेट मुद्द्याला हात घालत मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर सवालच केला आहे. काल तुम्ही जे काही बोललात. जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं, असं शिरसाट यांनी या पत्रात नमूद करून थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

बडवे फोनही रिसीव्ह करायचे नाहीत

शिरसाट यांनी या पत्रातून मातोश्रीवरील मध्यस्थांवरही टीका केली आहे. मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप वडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. 3 ते 4 लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे कुठे कुठे चुकले आहेत, याचा पाढाच जणू या पत्रातून वाचण्यात आला आहे.

राष्ट्रवादीची कामे होत होती, पण

मुख्यमंत्री आम्हाला भेटत नव्हते. पण दुसरीकडे ते राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या आमदारांना भेटत होते. त्यांची काम तुम्ही करत होता. त्यांच्या मतदारसंघात निधी जात होता. कामं झाल्याचा कागद ते आमच्या डोळ्यासमोर नाचवत होते. पण आमची कामं होत नव्हती. आम्हाला भेट दिली जात नव्हती. आम्हाला गृहित धरलं जात होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शिंदे भेटायचे पण तुम्ही…?

या पत्रातून शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांची वरेमाप स्तुती केली आहे. आम्हाला मातोश्रीची दरवाजे बंद होते. आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नव्हतं. पण आमच्यासाठी एकनाथ शिंदे यांचे दरवाजे कायम उघडे असायचे. ते आमचं म्हणणं ऐकून घ्यायचे आणि आमचे काम करायचे. पण तुम्ही कधीच भेटत नसायचे, असंही या पत्रात म्हटलं आहे.