‘माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील…’, विधानपरिषदेवर वर्णी लागताच सदाभाऊ खोत यांची पहिली प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची पाच नावे जाहीर केली आहेत. भाजपने पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.
Sadabhau Khot First Reaction : भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची पाच नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक होते. पण अखेर भाजपने पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. भाजपने नुकतंच एक परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
भाजपने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्यासाठी ही उमेदवारी समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली. यापुढे ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला ही उमेदवारी घोषित केली आहे.”
“मी याबद्दल निश्चित ऋणी राहिन”
“राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्यासाठी मी ही उमेदवारी समर्पित करतो. सर्व घटकांना घेऊन जाणारा भारतीय जनता पक्ष आहे. १८ पगड जातींना एकत्र ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपने केले आहे. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील, शेतकरी चळवळीतील, सामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एक मोठी संधी भाजपने दिली आहे. मी याबद्दल निश्चित ऋणी राहिन”, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
BJP announces the names of candidates for the Maharashtra Legislative Council biennial elections
Pankaja Munde also announced as party’s candidate for MLC elections pic.twitter.com/B3ijp0ZdCX
— ANI (@ANI) July 1, 2024
“भाजप सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष”
“सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष म्हणून भाजपकडे बघावं लागेल. या पक्षाने रामदास आठवले, माधव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे या सर्व घटकांना, तळातल्या माणसांना वर घेऊन जाण्याचे काम भाजपने सुरुवातीपासून केले आहे. तसेच निश्चित सर्वसामान्यांची बाजू घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम हे भाजपने केले आहे”, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.