‘शरद पवारांकडूनच सर्वात आधी पक्ष फोडण्याच्या राजकारणाला सुरुवात’; राज ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप
"या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रात कुणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवार यांनी केली. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. 1977-78 साली गोष्ट असेल, पुलोदचं सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा अशाप्रकारचं फोडाफोडीचं राजकारण झालं, या गोष्टीला शरद पवार यांनी सुरुवात केली", असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात जाहीर सभा पार पडली. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राज ठाकरे यांची आज ठाण्यातील कळवा येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनी सुरुवात केली, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केला.
“लोकांच्या जीवन-मरणाचे रोजचे जे विषय आहेत ते विषय यायला हवेत. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही आणि कधी होणारही नाही. पण या सगळ्यात जे आज बोलत आहेत की, आमचा पक्ष फोडला. तुम्ही सर्वजण जे कोणत्या आघाडीत बसला आहात, जरा एकमेकांकडे बघा, आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक हे खोके देवून फोडले होते ना? तेव्हा काही वाटलं नाही? अहो, मागितले असते तर दिले असते”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
राज ठाकरे शरद पवारांबाबत काय म्हणाले?
“काय ढेकणा संगे हिराही भंगला. बरोबर शरद पवार बसले आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रात कुणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवार यांनी केली. त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. 1977-78 साली गोष्ट असेल, पुलोदचं सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा अशाप्रकारचं फोडाफोडीचं राजकारण झालं, या गोष्टीला शरद पवार यांनी सुरुवात केली. मग 1991, याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फोडायला लावली. त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं”, असा घणाघात राज ठाकरेंनी केलं. “ज्या छगन भुजबळांना फोडलं, आज ते इथे असतील. माझा बाहेरुन पाठिंबा आहे त्यामुळे मी काहीही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉलचा जोड लागणार आहे”, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी राज ठाकरे यांनी केली.