मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणे यांचा फोन अखेर लागला आहे. राज ठाकरे यांनी फोनवरून नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या. सोमवारी सकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. मात्र, याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही राजकीय स्वरुपाची चर्चा झाली का, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी राज यांना तुम्ही नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्यात का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी माझा नारायण राणे यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही, असे म्हटले होते. नारायण राणे यांना मी फोन केला होता. त्यांचे दोन्ही फोन आणि त्यांच्या मुलांचे फोन बंद होते. उद्या परवा नारायण राणे यांच्यासोबत बोलणं होईल, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आज लगेचच राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.
कोकणात शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये होणारे राडे ही काही नवी बाब नाही. सेना आणि राणे (Rane Family) यांच्यातील राजकीय कलगीतुरा नेहमी रंगलेला असतो. पण रविवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे एक वेगळंच पहायला मिळालं. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वेंगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने विनायक राऊत आणि नितेश राणे एकत्र येताना दिसले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते. मात्र यावेळी चित्र उलट होते.
नितेश राणे आणि विनायक राऊत हे एकमेकांच्या कानात हितगुज करताना पहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहीर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केले. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल, या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की रंगेल. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी दिलेत.
संबंधित बातम्या:
नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या का? राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मनसेचं पुन्हा एकदा ‘मिशन नाशिक’, पुणे पाठोपाठ राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार
कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन’; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ