पुणे : नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा येथे सभा झाल्यानंतर, राज ठाकरे यांचा मोर्चा पुण्याकडे वळला. पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडगोळीवर तुटून पडताना, राज ठाकरे आज भावूक झाले. राज यांचे एकेकाळचे सहकारी आणि ‘गोल्डमॅन’ म्हणून प्रसिद्ध झालेले मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे अक्षरश: गहिवरले.
“खडकवासल्यात आल्यानंतर माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय राहत नाही, माझा वाघ गेला, तो आता असायला पाहिजे होता”, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या गहिरवरल्या काळजाला वाट मोकळी करुन दिली. राज ठाकरे यांनी रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर, उपस्थित लोकही काहीसे शांत झाले.
रमेश वांजळे हे राज ठाकरे यांचे एकेकाळचे सहकारी होते. ज्यावेळी एकाच फटक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले होते, त्यात एक रमेश वांजळे होते. अंगावर सोन्याचे दागिने घालण्याच्या त्यांच्या सवयीमुळे वांजळेंना अवघा महाराष्ट्र ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखत असे. कट्टर राज ठाकरे समर्थक म्हणूनही वांजळेंची महाराष्ट्राला ओळख होती. रमेश वांजळे यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं.
कोण होते रमेश वांजळे?
अंगावर अडीच किलोंच्या सोन्याच्या दागिन्यांमुळे बांद्यापासून चांद्यापर्यंत हर एका माणसाला ‘रमेश वांजळे’ हे केवळ नावच नव्हे, तर नावासह नजरेसमोर करारी बाण्याचा ‘सोनेरी’ धिप्पाड माणूस उभा राहतो. बोटातल्या अंगठीत राज ठाकरेंची प्रतिमा नि गळ्यातल्या लॉकेटमध्येही राज ठाकरेच, अशा निष्ठावंत आमदाराने अल्पावधितच ‘डॅशिंग आमदार’ म्हणून नाव कमावलं होतं. हिंदीतून शपथ घेणाऱ्या अबू आझमींचा माईक हिसकावून आपला आक्रमकपणा विधानसभेच्या पहिल्याच दिवशी दाखवणाऱ्या या सोनेरी आमदाराला अवघा महाराष्ट्र ओळखत होता.
पुण्याच्या हवेली तालुक्यातील अहिरे गावचे सरपंच, हवेली तालुका पंचायत समिती सदस्य ते अगदी विधानसभेतील आमदार…असा 25 वर्षांचा राजकीय प्रवास करणाऱ्या रमेश वांजळे यांचा 2011 च्या जून महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. रमेश वांजळे यांच्या अकाली निधनाने राजकारणापलिकडचा दिलदार माणूस हरपल्याची भावना अवघ्या मराठी माणसांच्या मनात होती आणि आहे.
दिवंगत रमेश वांजळे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी 2011 साली खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढल्या. दिवंगत रमेश वांजळे यांना आदरांजली म्हणून मनसेने हर्षदा वांजळेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र, त्यात भाजपच्या भीमराव तपकीर यांनी त्यांचा पराभव केला.
त्यानंतर रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांनीही राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सायली या 2014 साली पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि विजयी सुद्धा झाल्या. वारजे प्रभागातून निवडून आल्या. वयाच्या 22 व्या वर्षी सायली पुणे महापालिकेत सर्वात तरुण नगरसेविका म्हणून निवडून आल्या. अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धीच्या आणि लोकांमध्ये मिसळणाऱ्या सायली या महापालिकेच्या बालकल्याण समितीच्या सदस्या, शहर सुधारणा समितीच्या सदस्याही आहेत.
पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडली!
देश गळ्यात तंगडं अडकून पडलाय आणि नरेंद्र मोदी सांगतायत, योगा करा, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार घणाघात केला. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
उत्तर भारतात सभांची मागणी!
“मनसे लढत नसली तरी मी मोदी-शाह विरोधात प्रचार करतोय, हा प्रचार देशभर जातोय. माझ्या भाषणाच्या क्लिप देशात पसरत आहेत. उत्तर भारतात हिंदीत भाषण करा, यासाठी लोक माझ्या मागे लागलेत.” असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या पुण्यातील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :