राज ठाकरेंची पुन्हा परप्रांतीयविरोधी भूमिका? राज म्हणतात, बोटं छाटणारा बाहेर येऊ दे!
"यांची हिम्मत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल." असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
मुंबई : ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला आहे. “ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत.” असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा परप्रांतीयविरोधी भूमिका आळवत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल.” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
काय आहे प्रकरण?
ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
“तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष”
दरम्यान, राज्य सरकारकडून सणासुदीच्या काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
जन आशीर्वाद यात्रा, हाणामाऱ्या सुरू, मग सणांवर निर्बंध का?
गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे’ सरकारला असं झालं. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मोर्चे आंदोलन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार दुसरी, तिसरी लाट आणली जात आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे सणांवरच बंधन का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, असंही राज ठाकरे म्हणाले.
निवडणुकीच्या आखणीसाठी सर्व सुरू
लाट यायला हा काय समुद्र आहे का? काही जाणवतं का तुम्हाला? उगाच इमारती सील करायच्या. अमेरिकेचं अमेरिका बघेल. तुमच्याकडे नाही ना. आता सर्वांना बंदी करून ठेवायचं आणि हे सर्व निवडणुकीसाठी सुरु आहे, यांची आखणी झाली की निवडणुका जाहीर करायच्या, बाकीचे तोंडावर पडतील म्हणून. मी तर बाहेर पडतोच आहे, शुक्रवारी चाललो आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :