या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल, अमित ठाकरेंचा हल्लाबोल
अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार धरत टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मुंबई : राज्यभरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन आता राजकीय पक्ष आक्रमक झाल्याचं दिसतंय. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी खड्ड्यांच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक बोलावली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनीही खड्ड्यांबाबत आपली भूमिका मांडली आहे. अमित ठाकरे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला जबाबदार धरत टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
अमित ठाकरे म्हणाले, “रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल”
अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट
आशिष शेलार यांचा टोला
मुंबईतील सुमारे 2 हजार किमीच्या रस्त्यावर केवळ 927 खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे 48 कोटींची तरतूद केली ती याच 927 खड्यांसाठी का? असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यात झोल असा टोला लगावला.
रस्त्यांवरील एकूण 33 हजार 156 खड्डे बुजवले
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 9 एप्रिल 2021 ते दिनांक 11 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण 33 हजार 156 खड्डे बुजवले आहेत. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित केलेले सुमारे 2750 मेट्रिक टन कोल्डमिक्स 24 विभाग कार्यालयात वितरित करण्यात आलेले आहेत. त्यातून आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध कामगारांमार्फत 24 हजार 30 खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. तर, खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीत 9 हजार 126 खड्डे बुजविण्यात आले आहेत. याशिवाय, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादित वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही आर्थिक मोबदला दिला जात नाही.
मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी
राज्यात अनेक प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे पडलेले दिसून येत आहे. प्रामुख्याने मुंबई – गोवा महामार्गाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तर मुंबईतही अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहे. खड्ड्यात रस्ते गेल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. “रस्त्यावरील खड्ड्यांना जबाबदार कंत्राटदारांची गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यापुढे जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या
मुंबईतील केवळ 927 खड्डे बुजवायला 48 कोटींची तरतूद? आशिष शेलारांचा टोला