Amit Thackeray Mahim Vidhan Sabha 2024 : सरवणकरांच्या अर्ज मागे घेण्याच्या मुद्यावर अमित ठाकरेंच एका वाक्यात उत्तर
Amit Thackeray Mahim Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात बिग फाईट ज्या मतदारसंघात होणार आहे, त्यात माहीम विधानसभा मतदारसंघ आहे. माहीममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक रिंगणात आहे. आज अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. महाराष्ट्रात काही मतदारसंघात बिग फाईट असणार आहे. त्यात मुंबईतील माहीमच्या निवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. माहीम विधानसभा क्षेत्रातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांचं आव्हान आहे. अमित ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. सर्वप्रथम त्यांनी शिवाजी पार्कच्या उद्यान गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच दर्शन घेतलं. नंतर उमेदवारी अर्ज दाखल केला. मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: राज ठाकरे तिथे उपस्थित होते. मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आले होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. “माझा उमेदवारी अर्ज भरताना बरेच लोक आले होते. या माहीममध्ये मी लहानाचा मोठा झालो. अनेकांना मी काका बोलतो, ते सर्व हजर होते, मला बरं वाटलं” असं अमित ठाकरे म्हणाले. “मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार. मी माझं व्हिजन घेऊन लोकांपर्यंत जाणार. 23 तारखेला लोक काय कौल देतात? ते समजेल” असं अमित ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंबद्दल अमित ठाकरे काय म्हणाले?
राजकीय सभांवर भर देणार की, दारोदार प्रचारावर, यावर अमित ठाकरे यांनी ‘दारोदार प्रचारावर भर असल्याच सांगितलं’. “सभांऐवजी मला प्रत्येक घरापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचायच आहे. वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, तो सार्थ करायचा आहे” असं अमित ठाकरे यांनी सांगितलं. सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण सदा सवरणकर अजूनही विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अमित ठाकरे यांना या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी फॉर्म कोण मागे घेणार हे मला माहित नाही, असं उत्तर दिलं. आदित्य ठाकरेंनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात, त्यावर अमित ठाकरे म्हणाले, माझ्याकडूनही त्यांना शुभेच्छा.