Raj Thackeray : राज ठाकरेंच्या मते कुठले तीन जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात?
Raj Thackeray : "एरवी भाषण करायला फरक पडत नाही. पण निवडणुकीतली भाषणं कंटाळवाणी असतात, सगळ्याच ठिकाणी जाऊन तेच तेच बोलावं लागतं. तुम्ही ऐकता, टीव्हीवर तेच ऐकता. कधीकधी वाटतं निवडणूक झाली की, लोक पण भाषण बोलू शकतात. इतकं पाठ होत असेल"
“अनेकजण सांगत होते, साहेब संध्याकाळची सभा द्या, म्हटलं निवडणूक आयोगाला सांगा आणि संध्याकाळ वाढवून घ्या. जेमतेम 13 दिवस उरलेत. त्यात किती आणि कुठे-कुठे सभा घ्यायच्या?. एरवी भाषण करायला फरक पडत नाही. पण निवडणुकीतली भाषणं कंटाळवाणी असतात, सगळ्याच ठिकाणी जाऊन तेच तेच बोलावं लागतं. तुम्ही ऐकता, टीव्हीवर तेच ऐकता. कधीकधी वाटतं निवडणूक झाली की, लोक पण भाषण बोलू शकतात. इतकं पाठ होत असेल” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. गुहागर इथे मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा झाली.
“महाराष्ट्रात विषयांची कमतरता नाही. दुपारची सभा लावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जास्तवेळ या फटाक्यांमध्ये जातो. पूर्वी बरं होतं, एक फटाका होता, आता वात लावली की, फटाके आहेत की, लोकसंख्या तेच कळत नाही. आज कोकणात आलोय. कधीही कोकणात या कोकण भुरळच घालतं. मी ज्या ज्यावेळी परदेशात जातो. परदेशातले डोंगर, समुद्र किनारे पाहतो, डेवलप झालेले पाहतो. प्रत्येकवेळी खंत, दु:ख वाटतं. हे सगळं परमेश्वराने आपल्याला दिलय, मग आमच्याकडे का होत नाही? खरंच भाग्यवान आहात तुम्ही, कोकणात जन्माला आलात” असं राज ठाकरे म्हणाले.
‘चुकीची माणसं तुम्ही निवडून दिलीत’
“एकाच बाबतीत तुमचं दुर्भाग्य, चुकीची माणसं तुम्ही निवडून दिलीत. आजपर्यंत ज्यांना निवडून दिलतं, त्यांनी वास्तवात काही केलं नाही. आपली खळगी भरली. ते मोठे झाले, त्यांची फार्म हाऊसेस झाली. पण या भागात म्हणून काही आलं नाही. या भागात उद्योग-व्यवसाय नसल्यामुळे इथले तरुण-तरुणी मुंबई-पुण्यात निघून जातात. मराठवाडा, विदर्भात गेलं तरी हेच. शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी मुंबई-पुण्यात जातात. आणि मुंबई-पुण्याचे तरुण-तरुणी परदेशात निघून जातात” असं राज ठाकरे म्हणाले.
‘पर्यटनावर हे तीन जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात’
“कोकणाला 750 किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे. आमच्याकडे कसले प्रोजेक्ट येतात ऊर्जेचे, रिफायनरीचे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सुंदर प्रदेश आहेत. पर्यटनावर हे तीन जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात. कधी केरळमध्ये रिफायनरी आल्यात का? अख्ख राज्य पर्यटनावर चालतं. लांब कशाला जाता, शेजारचा गोवा घ्या. पर्यटन या विषयावर गोवा सुरु आहे. तुम्ही कल्पना सुद्धा करु शकत नाही, इतकं सुंदर कोकण करता येईल. तुम्हाला घर, गाव, तालुका सोडण्याची गरज नाही. हे आमचे खासदार दिल्लीत जाऊ काय करतात?. कोकणाच्या विषयात आतापर्यंत कोणते प्रश्न मांडले?. पर्यटनाचे कोणते मुद्दे मांडले?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.