मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राष्ट्रवादीवर (NCP) आणि पर्यायाणे शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. राष्ट्रवादी आणि मनसे (MNS) नेत्यांमध्ये या न त्या कारणावरुन वार पलटवार, टीका टिप्पणी सुरू असतात. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा पक्ष नाही, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. मनसैनिकांनी हे पत्रक घराघरापर्यंत पोहोचवावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. यावरुनच जयंत पाटलांनी यांनी मनसेला डिवचलंय.
जयंत पाटील यांनी मनसेची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा नाही. त्यांनी जे पत्रक काढलं आहे, ते कुठपर्यंत पोहोचतंय त्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहून बोलेन, असं पाटील यांनी म्हटलंय. यामुळे प्रचंड राजकारण तापलंय.
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर पलटवार केलाय. ते म्हणाले की, ‘आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष 2 जिल्हाभर कसा वाढेल. हे पहा. जयंत पाटलांच्या राष्ट्रात हा पक्ष फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आहे. विधानपरिषदेच्या बाहेर जयंत पाटलांनी 5 हजार लोक जमा करून दाखवावीत. चार खासदार आणि आपण पंतप्रधान बनण्याची स्वप्न बघता ? पाटील साहेब खूप जास्त बोलत आहेत,’ असं काळे यावेळी म्हणालेत.
मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पहिल्या दिवसांपासून मास्क घातलं होतं. तरीही दोनदा कोरोना झाला आहे. सुप्रियाताई नेहमी मास्क घालत होत्या. सुप्रियाताई यांनासुद्धा कोरोना झाला होता. एखाद्या आजाराची चेष्टा करणाऱ्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजितदादांना शोभत नाही. मुद्दे कुठे भेटले नाही तर राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा असा स्वभाव आहे? तो त्यांनी बदलावा एवढीच विनंती करतो.’