मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापाठोपाठ आता मनसेनेही राज्यातील जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. वीजबिल भरू नका. काय होतं ते पाहू पुढे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. (bala nandgaonkar has appealed to the people not to pay electricity bills)
बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. सोमवारनंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील. आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, असंही ते म्हणाले.
लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून दरम्यान जे वाढीव बिल देण्यात आलं त्याचा सरकारनं गांभीर्यानं विचार करायला हवा होता. दिवाळीपर्यंत आम्ही गोड बातमी देऊ असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. अजूनही ही बातमी आली नाही. एकीकडे सरकार निर्णय घेऊ म्हणून सांगत आहे आणि दुसरीकडे राज्याचे मंत्री वाढीव बिल माफ केलं जाणार नसल्याचं सांगतात. तुमच्यातच एकोपा नसेल तर लोकांनी त्याचा भुर्दंड का सोसायचा? असा सवाल करतानाच म्हणूनच आम्ही जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन करत आहोत, असं नांदगावकर म्हणाले. जोपर्यंत राज्य सरकार निर्णय घेत नाही. तोपर्यंत बील भरूच नका. या सरकारला निर्णय घ्यायला आपण भाग पाडलंच पाहिजे, असंही ते म्हणाले.
1995 ला राज्यात युतीचं सरकार होतं. त्यावेळी राज्यावर 16 हजार कोटींचं कर्ज होतं. आता राज्यावर सुमारे साडेपाच लाख हजार कोटींचं कर्ज आहे, असं सांगतानाच वीजबिल माफीसाठी केवळ साडेचार हजार कोटी लागणार आहेत. त्यामुळे आणखी पाच हजार कोटींचं कर्ज घेतलं तर बिघडलं कुठे? घ्या कर्ज आणि द्या जनतेला दिलासा. कशाला भाजपवर बिल फाडता, असंही ते म्हणाले. राज्य सरकारने एसटी महामंडळाला एक हजार कोटी रुपये दिले. दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारने निर्णय घेतला. आता वीजबिल माफीसाठी जनतेने आत्महत्याच केली पाहिजे का?, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/JiyjXqACaq
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2020
संबंधित बातम्या:
शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही : बाळा नांदगावकर
सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम, वीजबिल कमी करा अन्यथा उग्र आंदोलन, मनसेचा एल्गार
भाजपमध्ये मराठी माणसं नाहीत का?; प्रवीण दरेकरांचा राऊतांना सवाल
(bala nandgaonkar has appealed to the people not to pay electricity bills)