Mns-Mahayuti : मनसे-महायुतीच पुढे काय झालं? बाळा नांदगावकरांकडून महत्त्वाची अपडेट
एक-दोन दिवसात मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार म्हणून चर्चा सुरु झाली. आता आठवडा होत आला, तरी मनसे नेमकी कुठे आहे? मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नांची उत्तर अजून मिळालेलीच नाहीत. कुठेतरी ही चर्चा मागे पडलीय किंवा थंड पडलीय, असं चित्र आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण अजूनही मविआ आणि महायुतीकडून राज्यातील जागा वाटप पूर्णपणे जाहीर झालेलं नाही. काही जागांवरुन मविआ आणि महायुतीमध्ये मतभेद कायम आहेत. ठाकरे गटाने आज राज्यातील 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीय. त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडी वेगाने घडत आहेत. पुढच्या दोन-तीन दिवसात बरचस चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार? हा सुद्धा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.
मागच्या आठवड्यात मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार म्हणून जोरात चर्चा सुरु झालेली. राज ठाकरे दिल्लीला गेले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची चर्चा झाली. त्यानंतर एक-दोन दिवसात मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार म्हणून चर्चा सुरु झाली. आता आठवडा होत आला, तरी मनसे नेमकी कुठे आहे? मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नांची उत्तर अजून मिळालेलीच नाहीत. कुठेतरी ही चर्चा मागे पडलीय किंवा थंड पडलीय, असं चित्र आहे.
मनसे शिवसेनेमध्ये विलीन होऊन राज ठाकरे प्रमुख होणार का?
आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. “आजची आमची बैठक फक्त गुढी पाडावा मेळाव्यासंदर्भात होती. जी माहिती तुम्हाला हवीय, त्यासाठी तुम्ही थोडी प्रतिक्षा करा. राजकारणात ज्याच्याकडे संयम आहे, तो पुढे जातो. दोन-चार दिवसात या प्रश्नांची उत्तर मिळतील” असं बाळा नांदगावकर म्हणाले. मनसे शिवसेनेमध्ये विलीन होऊन राज ठाकरे प्रमुख होणार का? या प्रश्नावर बाळा नांदगावकर म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे मीडियामध्ये ही चर्चा आहे. या बाबत चर्चा झाली असेल, तर पक्षप्रमुखांना या बद्दल माहिती असेल. या विषयावर आमच्याशी बोलण झालेलं नाहीय”
किती जागा मागितल्यात?
“आम्ही महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी 3 जागा मागितल्या आहेत. त्यातल्या दोन जागांसाठी चर्चा सुरु आहे. महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पक्षप्रमुख ठरवतील” असं बाळा नांदगावकर म्हणाले.