MNS vs NCP : राड्यानंतर कार्यकर्त्याचा मृत्यू, अजितदादांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी
MNS vs NCP : "सुनील तटकरेच्या प्रचारात मनसेने सर्वस्व झोकलं होतं, राष्ट्रवादीचे नेते नितीन सरदेसाईकडे गेले होते. वैभव खेडेकरचा या गोष्टीला विरोध होता, त्यांनी सगळ्यांनी मिळून गळ घातली राष्ट्रवादीचा प्रचार करा ते तुम्हाला चाललं, तेव्हा राज ठाकरे सुपारीबाज नव्हते का?" असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला.
महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी विरुद्ध मनसे कार्यकर्ते असा सामना सुरु झाला आहे. काल मनसे कार्यकर्त्यांनी अकोला येथे अमोल मिटकरींची गाडी फोडली. या राड्यावेळी उपस्थित असलेल्या एका मनसे कार्यकर्त्याचा नंतर ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल सुपारीबाज हा शब्द वापरला, त्यानंतर मनसे कार्यकर्तेच संतप्त झाले. “कार्यकर्ते जाब विचारायला गेल्यानंतर त्याचा परिणाम गाडी फोडण्यात झाली, मिटकर यांनी आक्रस्ताळपणे पोलीस स्टेशनमध्ये धरणे देऊन गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. त्याचा तणाव येऊन आमच्या तरुण कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला” असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
“ज्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, त्या बद्दल महाराष्ट्र सरकारने ताबडतोब आमदार अमोल मिटकरी, उमेश पाटील व अजित पवार यांच्यावर 307 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा” अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. “अमोल मिटकरी एका संविधानिक पदावर आहेत. राज साहेबांनी कोणाची सुपारी घेतली? जरंडेश्वर कारखान्याची तर सरकारने चौकशी केली. खुद्द पंतप्रधानाने इंदूरच्या सभेत सांगितलं होतं 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला, पवार कुटुंब एकत्र असताना कन्नडचा कारखाना कसा घेण्यात आला ?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला.
अमोल मिटकरीच्या सडक्या मेंदूतून निघालेली कल्पना
“त्यांच्याकडे पाटबंधारे खातं असताना, त्यात भ्रष्टाचार झाला याची विधानसभेत चर्चा झालीय, असं असताना तुम्ही राज ठाकरेंवर कसा आरोप करू शकता?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला. “महायुतीमध्ये आता अजित पवारला काही स्थान उरलं नाही, त्याला बाहेर पडण्याचं कारण पाहिजे. महायुतीच्या नेत्याचे आणि राज ठाकरेंचे व्यक्तीगत संबंध आहेत. कुठेतरी राज ठाकरे वर आरोप केले तर महायुतीत काहीतरी गडबड होईल अशी अमोल मिटकरीच्या सडक्या मेंदूतून निघालेली ही कल्पना असू शकते” असं प्रकाश महाजन म्हणाले.
तेव्हा राज ठाकरे सुपारीबाज नव्हते का?
“सुनील तटकरेच्या प्रचारात मनसेने सर्वस्व झोकलं होतं, राष्ट्रवादीचे नेते नितीन सरदेसाईकडे गेले होते. वैभव खेडेकरचा या गोष्टीला विरोध होता, त्यांनी सगळ्यांनी मिळून गळ घातली राष्ट्रवादीचा प्रचार करा ते तुम्हाला चाललं, तेव्हा राज ठाकरे सुपारीबाज नव्हते का? तेव्हा गरज होती तुम्हाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या बाजूने उभी नसती तर काय चित्र असतं?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला.
“हे सगळं घडण्यामागे सडक्या मेंदूचा अमोल मिटकरी आहे, त्यातून हे सगळं घडलं, त्यामुळे आम्हाला एका तरुण कार्यकर्त्याला मुकाव लागलं. म्हणून अमोल मिटकरी, उमेश पाटील, अजित दादा यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात यावा” अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.