विनोद तावडेंना मनसे नेते संदीप देशपांडेंचं ओपन चॅलेंज
मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोलखोल करत जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अत्यंत जहरी शब्दात राज ठाकरेंवर कालच्या सभेवरुन टीका केली. त्यानंतर आता मनसेकडूनही विनोद तावडेंसह […]
मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोलखोल करत जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अत्यंत जहरी शब्दात राज ठाकरेंवर कालच्या सभेवरुन टीका केली. त्यानंतर आता मनसेकडूनही विनोद तावडेंसह भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ओपन चॅलेंज
“विनोद तावडेच नव्हे, भाजपच्या तमाम नेत्यांना माझं आव्हान आहे की, त्यांच्यात हिंमत असेल, जे प्रश्न राजसाहेबांनी विचारले आहेत, हिंमत असेल तर मुद्देसूद उत्तरे द्यावीत अन्यथा फालतू बडबड बंद करावी.” असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
तसेच, “विनोद तावडेंमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी आमच्यासोबत हरिसालला यावं. आमची एक तरी गोष्ट खोटी ठरली, तर मी राजकारण सोडायला तयार आहे किंवा त्यांनी तरी राजकारण सोडावं, हे माझं त्यांनी खुलं आव्हान आहे.,” असेही संदीप देशपांडे म्हणाले.
अन्यथा राज ठाकरेंना पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत, तावडेंची जहरी टीका
“विनोद तावडे हे राज ठाकरेंचं वाक्य मोडून-तोडून सांगत आहेत. राजसाहेब असे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आता ज्याप्रकारे देश खड्ड्यात घातला आहे, त्यापेक्षा खड्ड्यात देश जाऊ शकत नाही. हे राजसाहेबांचं वाक्य होतं. मात्र, खोटं बोला, रेटून बोला, ही जी गोबेल्सनिती आहे, ती भाजपची असल्याने विनोद तावडे अशी वक्तव्य करत आहेत.”, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी विनोद तावडेंसह भाजपवर टीकास्त्र सोडलं.
विनोद तावडेंनी राज ठाकरेंवर काय टीका केली होती?
“देश खड्ड्यात घालायला राहुल गांधींना पंतप्रधान करा, म्हणायला तो काय मनसे पक्ष आहे का? आणि राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते शरद पवारांना विचारा, अन्यथा पुढच्या स्क्रीप्ट मिळणार नाहीत.” अशी टीका विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर केली. पंतप्रधानपद हा काही खेळ नाही, हा भारत देशाचा प्रश्न आहे, असा टोमणाही तावडेंनी राज ठाकरेंना लगावला.
VIDEO : मनसे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?