मुंबई : “तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. ज्यावेळेला आमचे अमित ठाकरे एका गंभीर आजाराशी लढत होते त्यावेळेला आमचे मनसेचे नगरसेवक पाच-पाच कोटी रुपये देऊन फोडले तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही? त्यावेळेला तुमचा धर्म कुठे गेला होता?”, असा घणाघात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क मैदानात मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात संदीप देशपांडे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर सडकून टीका केली. “आम्हाला आमच्या नेत्याचा का अभिमान आहे? कारण आमच्या नेत्याने जे मिळवलं ते स्वकर्तृत्वाने मिळवलं. कुणाचातरी मुलगा म्हणून आम्हाला काही मिळालेलं नाही. मुलगा म्हणून मिळालेलं असलं की रडायला होतं. पाठींत खंजीर खुपसला. आम्हाला फसवलं. यांना खोके दिले”, असा टोला त्यांनी लगावला.
“महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 17 वर्ष झाली. या सतरा वर्षात आपण काय केलं, जे इतर पक्षांनी गेल्या 25 ते 30 वर्षात केलं नाही? असं कुणी विचारलं तर ते असेल संघर्ष. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक निवडणुकीत यश येवो किंवा अपयश येवो पण हा कधी घाबरला नाही. संघर्ष करायला, रस्त्यावर उतरायला कधी कचरला नाही. ही शिकवण आम्हाला कुणी दिली असेल की, अपयशाला घाबरु नका आणि यशाने माजू नका, ही शिकवण कुणी दिली असेल तर ती आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. आम्ही राज ठाकरे यांचे कट्टर महाराष्ट्र सैनिक आहोत”, असं संदीप देशपांडे म्हणाले.
“तुम्ही आज आम्हाला सांगताय? राज ठाकरे यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला. स्वकतृत्वाने तो वाढवला. जे मनसेला यश मिळालं मी अभिमानाने सांगतो, बाळासाहेब ठाकरे हयात असताना मिळालं. हे यश राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकाच्या कामांमुळे यश आलं. शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. त्यापैकी 40 फुटले. हे तुमचं यश की अपयश? आमचा एकच आहे राजू दादा. एक ही है, लेकीन काफी है. तुमचे 56 असून उपयोग काय? त्यामुळे यश आणि अपयशाची व्याख्या काय ते करावी लागतो”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
“मला माझ्या नेत्याचा अभिमान वाटतो. जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा स्तुती केली. जेव्हा योग्य वाटलं नाही तेव्हा लाव रे तो व्हिडीओ लावून अख्ख्या महाराष्ट्राला खरी परिस्थिती दाखवली. तुमच्यात ती हिंमत होती का? 2014 ला वेगळी निवडणूक लढवली. त्यानंतर पुन्हा भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. पाच वर्ष मांडीवर जाऊन केलंत काय? तर राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. आज देतो राजीनामा तेव्हा देतो राजीनामा. पाच वर्षात राजीनामा दिला नाही. 2019 च्या निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवली आणि नंतर आपण मुख्यमंत्री बनू शकतो असं लक्षात आल्यानंतर शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले”, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला.