Sandip Deshpande | आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरं, सगळा घरचाच मामला, मनसे नेते संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर तिखट प्रतिक्रिया
मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले तेव्हा शिवसैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक असा उल्लेख केला होता. यावरून संदीप देशपांचेंनी शिवसेनेलाच सुनावले.
मुंबईः अडीच वर्षे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फक्त संपत्ती कमावली आता पुढची अडीच वर्ष त्यांना संपत्ती कमवायची आहे. म्हणून त्यांनी अशी मुलाखत प्रसिद्ध केल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली आहे. ‘सामना’चे संपादक खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून त्याचा काही अंश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर भाजप, मनसे तसेच एकनाथ शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तर ही कसली मुलाखत, आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरं, सगळा घरचाच मामला अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र तुम्ही इतरांशी ज्या कपटाने आजापर्यंत वागलात तेच आज तुमच्या बाबतीत घडलंय. कर्माची फळं इथच भोगावी लागणार आहेत, असं वक्तव्यही संदीप देशपांडे यांनी केलं.
अडीच वर्षे संपत्ती कमावली…
संदीप देशपांडे उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, ‘ अडीच वर्षे संपत्ती कमावली आता पुढची अडीच वर्षे सिंपथी कमवायची आहे. नियती ही तिचं चक्र पूर्ण करायची आहे. जी गोष्ट तुमच्यासोबत केली ती तुमच्याबाबतीत घडते. तुम्ही मसनेचे सहा नगरसेवक फोडले आज तुमचे आमदार फुटले. अमित ठाकरेंची तब्येत बरी नव्हती. राजसाहेब त्यात व्यस्त होते. त्यावेळेला सहा नगरसेवक फोडायचं पाप तुम्ही केलं. आज तीच गोष्टी तुमच्याबाबत घडतेय…. कर्माची फळं इथेच भोगायची आहेत. ते तुम्ही भोगत आहात.
तेव्हा म्हणाले सर्जिकल स्ट्राइक…
मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले तेव्हा शिवसैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक असा उल्लेख केला होता. यावरून संदीप देशपांचेंनी शिवसेनेलाच सुनावले. ते म्हणाले, ‘ मनसे फोडली तेव्हा शिवसेनेचे नेते सर्जिकल स्ट्राइक म्हणून बोंबा मारत होते. आता तुमचे आमदार फुटले तर सिंपथी पाहिजे का? बरं तुम्ही एका ठिकाणी म्हणताय, सन्माननीय बाळासाहेबांचं नाव कुणी वापरू नका… मग त्यांच्याच स्मारकासाठी जेव्हा महापौर बंगला मागितला तेव्हा ते पूर्ण महाराष्ट्राचे होते ना… आता ते एकट्याचे कसे झाले? मुळात बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे. विचारावर कुणाचाही मालकी हक्क नसतो. बाळासाहेब महाराष्ट्राचे काय देशाचे नेते होते. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्याचे अर्थ बदलता का?
सगळा घरचाच मामला…
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, ‘ आजची मुलाखत म्हणजे आपलेच प्रश्न आणि आपलीच मुलाखत. सगळा घरचाच मामला. आता त्याचंही लोकांना अप्रुप राहिलेला नाही. पालापाचोळा अडीच वर्ष तुमच्याबरोबर होता. तेव्हा तो चांगाल होता. लोकांच्या बाबतीत तुम्ही जे कपट केलं, तेच तुमच्याबाबतीत घडलंय.
मुख्यमंत्री बेस्ट… सर्वे कुणी केला?
बेस्ट मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरे म्हणवतात, पण हा सर्वे कुणी केलाय, असा सवाल संदीप देशपांडेंनी केला. ते म्हणाले, ‘ पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट आहेत, असं म्हटलं जातं. हा सर्वे कोणत्या संस्थेने केला? त्याआधी त्यांनी कोणता सर्वे केला होता? त्या संस्थेने बेस्ट सीएमचा सर्वे केला. आपणच बोगस संस्था उभ्या करायच्या, आपणच बेस्ट म्हणून घ्यायचं. त्यानंतर या संस्थेने कोणताही सर्वे केला नाही. यापुरतंच ही संस्था तयार केली होती का? कोरोना काळात लोकांचे जे हाल झाले, लोकांना बेड, अँब्युलन्स मिळाली नाही. तुम्ही घरात होता, म्हणून महाराष्ट्राची वाट लागली.