मुंबई : कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला. कर्नाटकात भाजपला 137 तर भाजपला 65 जागा मिळाल्या. 22 वर्षांनंतर काँग्रेसला कर्नाटकात बहुमत मिळालं. या विजयासाठी काँग्रेसकडून जल्लोष केला जातोय. इतर मित्रपक्षही काँग्रेसचं अभिनंदन करत आहेत. अशात मनसेच्या नेत्यानंही काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. पत्र लिहित त्यांनी अभिनंदन केलं आहे.
हे पत्र यशवंत किल्लेदार यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. कर्नाटकच्या विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन आणि जनमताचा कौल झुगारुन घोडेबाजार करणाऱ्यांसाठी बोध!, असं कॅप्शन त्याला देण्यात आलं आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र
आज कर्नाटकमध्ये काँग्रेसने यश मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे. प्रथम त्यासाठी काँग्रेसचं मनःपूर्वक अभिनंदन.
कर्नाटकात २०१८ साली झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नव्हते, मात्र काँग्रेस आणि जेडीएसने युती करुन बसवलेलं सरकार भाजपने २०१९ मध्ये ऑपरेशन ‘ब्लू लोटस’ राबवत पाडलं, आणि स्वतःच सरकार बसवलं. पण तिथल्या जनतेला हा घोडेबाजार लक्षात राहिला आणि जनतेने भाजपला चांगलाच धडा शिकवला.
आज कर्नाटक निवडणुकांचे हाती आलेले कल पाहता, भाजपच्या विरुद्ध जनतेच्या मनात रोष दिसून येत आहे. भाजप खेळलेल्या अशा फोडाफोडीच्या खेळीमुळे त्यांच्या मतदार संकेतही प्रमाणात घट दिसून येत आहे. महाराष्ट्रातही २०१९ ला झालेल्या निवडणुकीत जनतेने शिवसेना-भाजप युतीला कौल दिला होता. मात्र त्यांच्या अंतर्गत वादामुळे आधी राष्ट्रवादी भाजपा त्यानंतर महाविकास आघाडी आणि आता पुन्हा भाजपच्या घोडेबाजारामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट) हे सरकार उदयास आलं.
प्रस्थापित राजकारण्यांचा जनतेच्या मनाविरोधात चाललेला हा राजकारणाचा खेळ जनता पाहत आहे. येणाऱ्या काळात आगामी निवडणुकांमध्ये कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातली ही जनता राजकारणाचा आणि जनतेच्या मनाचा खेळ करणाऱ्या राजकारण्यांना आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींमध्ये हात असलेल्या देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे यांची कूटनीती महाराष्ट्र पाहत आहे. लवकरच जनतेची काठी चालेल आणि कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्राची जनता ह्या निगरगट्ट राजकारण्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही!
आपला नम्र
यशवंत किल्लेदार
कर्नाटकच्या विजयासाठी काँग्रेसचं अभिनंदन आणि जनमताचा कौल झुगारुन घोडेबाजार करणाऱ्यांसाठी बोध! #karnatakaelections #Congress #MNS@INCKarnataka @BJP4India @Dev_Fadnavis @mnsadhikrut pic.twitter.com/Kb3tc4Y20R
— Yashwant Killedar (@YKilledar) May 13, 2023