Raj Thackeray | अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून बघा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्या हिप बोनची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.
मुंबईः राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे (Maharashtra Politics) संधी म्हणून पहा, अशा महत्त्वाच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून विश्रांतीवर असलेले राज ठाकरे आता अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं दिसंतय. राज ठाकरेंच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया झाली होती. तत्पूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांना कशा प्रकारे काम करायचं, याचा संदेश दिला होता. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मनसेच्या (MNS) महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि मागील दोन महिन्यात झालेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच उद्यादेखील राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे यांनी बोलावली असल्याची माहिती हाती आली आहे.
राज ठाकरे यांचे आदेश काय?
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधून म्हटले की, लोकं सध्याच्या राजकारणाला वैतागले आहेत. त्यामुळे ही अस्थिरता एक संधी आहे, अशा अर्थाने पहा. लोकं आपला विचार करत आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जा, पक्ष संघटन वाढवा, अशा सूचना राज ठाकरे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.
25 ऑगस्टपासून मनसेची सदस्य नोंदणी
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची लवकरच सदस्य नोंदणी सुरु होतेय. 25 ऑगस्टपासून राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये मनसेची नोंदणी सुरु केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणच्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
भाजपसोबत की स्वबळावर लढणार?
आगामी निवडणुकीत मनसे भाजपसोबत लढणार की स्वबळावर उमेदवार उभे करणार, यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल. कारण राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांना यासंदर्भातील चाचपणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. सध्याच्या राजकीय स्थितीबाबत कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं, हेही जाणून घ्या, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
20 जून रोजी शस्त्रक्रिया
राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी शस्त्रक्रिया झाली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्या हिप बोनची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. ही विश्रांती पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे आता पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचे दिसून आले आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.