नवी मुंबई : “मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तरीही शेवटी सत्याचा विजय झाला. असे कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी आम्ही त्याला घाबरणार नाहीत. तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार”, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं तळोजा कारागृहाबाहेर स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली (Avinash Jadhav first reaction after bail).
“ठाण्यातील जे राजकीय नेते मला अडकविण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला काय संपवायचं आहे ते संपवा. पण अडीशचे मुलींचं कुटुंब उद्ध्वस्त करु नका. तुम्हाला मी खुपसतो. मी जे खरंय ते लोकांसमोर मांडतो. तुम्हाला खरं ऐकायचं नसेल तर हरकत नाही”, असं अविनाश जाधव म्हणाले (Avinash Jadhav first reaction after bail).
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“तुम्ही मला अडकवण्याचा जो काही प्रयत्न केला ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. तुम्हाला मला संपवायचं असेल तर नक्कीच संपवा. पण अडीचशे मुलींचं नुकसान करु नका. जर तसं करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या कुठल्याही केसेसला घाबरत नाही”, असं अविनाश जाधव म्हणाले.
“माझ्यावर वसईतही खोटा गुन्हा दाखल झाला. वसईत घडलेला प्रसंग योग्य होता. पण कलम 353 नुसार तिथे गुन्हा दाखल होत नव्हता. माझ्यावर तिथे 48 तासांनी 353 गुन्हा दाखल केला. जर मी आरोपी वाटत होतो तर पोलिसांनी त्याक्षणालाच मला अटक करायला हवी होती. दोन दिवसांनी कोणाच्या दबावाखाली कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला?”, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला.
“ठाण्यात गुन्हाच घडला नाही. ठाण्याबाबत जो व्हिडीओ आज कोर्टाला मी दाखवला त्यात पूर्णपणे स्पष्ट होतंय की, हा गुन्हा खोटा आहे. खरंतर मला त्यादिवशी ठाण्याच्या नौपाडा पोलीस घेऊन जायला हवे होते. पण खंडणीपथक घेऊन गेलं. क्राईम ब्रांच आणि खंडणीपथकाचा यात काय संबंध?”, असाही सवाल अविनाश जाधवांनी केला.
नेमकं प्रकरण काय आहे?
नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला होता, मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सात दिवसानंतर जामीन मंजूर केला आहे.
अविनाश जाधव यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले. “न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोविडसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती. पुढेदेखील अशीच लढाई जनेतेसाठी सुरू राहील” असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
ठाणे पोलिसांनी कोर्टाकडून अधिक वेळ मागितला होता. तर अविनाश जाधव यांच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायाधीश पी पी जाधव यांनी ऐकून घेतले आणि त्यांना जामीन मंजूर केला. अविनाश जाधव यांना सोमवारी पोलीस स्थानकात हजेरी द्यावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन
तडीपारीची नोटीस, कोर्टात नेताना मनसैनिकांचा अविनाश जाधवांवर फुलांचा वर्षाव
संबंधित व्हिडीओ :