कालपर्यंत अदानी तुमचे मित्र होते, आता अचानक यु-टर्न का ? मोहीत कंबोज यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टिका
उद्धव ठाकरे यांच्या कालच्या धारावीतील महामोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने वातावरण ढवळून गेले आहे. या मोर्चात बाहेर माणसे आणल्याची टीका काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. तर भाजपाच्या अनेक नेत्यांनी काल उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतले. भाजपाचे नेते मोहीत कंबोज यांनी तर उद्धव ठाकरे यांना दुबईत हॉटेल विकत घ्यायचे असल्याने त्यांनी अदानींकडून 10 अब्ज रुपयांची वसुली करायची आहे अशी टीका केली.
मुंबई | 17 डिसेंबर 2023 : उद्धव ठाकरे यांनी काल अदानी धारावी प्रकल्पाच्या विरोधात मोठा मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले आहे. यानंतर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. आता भाजपाचे अन्य एक नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत धारावीचा विकास करणे, टेंडर पॉलिसी बनविणे अशी कामे त्यांनी मोठ्या आवडीने केली. मग आता अचानक यु-टर्न घेत धारावी प्रकल्पाविरोधात आंदोलन का ? असा सवाल मोहीत कंबोज यांनी केला आहे.
भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना दुबईत हॉटेल खरेदी करायचे आहे, म्हणून त्यांना अदानीकडून दहा अब्ज ( 10,00,00,00,000 ) वसुल करायचे आहेत म्हणून त्यांनी धारावी अदानी प्रकल्पाविरोधात मोर्चा काढल्याचे ट्वीट मोहीत कंबोज यांनी काल रात्री केले होते. यामुळे खळबळ उडाली होती. आता मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा टार्गेट करीत कालपर्यंत गौतम अदानी तुमचे जिवलग मित्र होते. तुमचे जिवलग मित्र होते. तुमच्या घरी यायचे आणि तुम्ही त्यांच्या घरी जायचा मग आता अचानक काय झाले ? तुम्ही अदानींच्या विमानाने दिल्लीला जाता आणि त्यासाठी पैसैही देत नाही. आदित्य ठाकरे अदानी यांच्या विमानाने औरंगाबादला जातात असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय अनेकदा गौतम अदानी यांच्या वैयक्तिक गोष्टींचा लाभ पदरात पाडला आहे. मग आता कोणता टीडीआर कमी करायचा. कोणता वसुल करायचा ? मातोश्री 3 करायचीय ? की तुमची भूमिका अचानक बदलली ? तुम्ही मुंबई लुटली, बीएमसीही लुटली आता तुमच्या मनात काय आहे ते देशाला सांगा असेही मोहीत कंबोज यांनी टीका करताना म्हटले आहे.
आदित्य ठाकरेंनी कॅव्हेट का दाखल केले ?
दिशा सालियन प्रकरण असो की सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो. एसआयटी बसली असून ती तपास करेलच. तपासात जो दोषी आहे त्याला शिक्षा होईलच. आदित्य ठाकरे यांच्या मनात कोणती अशी भीती होती की आपल्या विरोधात आदेश येऊ नये म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन कॅव्हेट दाखल केले. तुमच्या मनात काही तर काळं आहे. आमच्यावर इतके गुन्हे दाखल झाले. उद्धवसाहेबांनी एकही खटला सोडला नाही,आम्ही कधीही कॅव्हेट दाखल केले नाही. काही चूक नसताना आदित्यना कसली भीती वाटतेय असा सवाल त्यांनी केला.
वरळी निवडणूकी भीती कोणाला ?
वरळीतून निवडणूक लढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आधी वरळीच्या आमदाराचे तिकीट रद्द केले. नंतर नंतर राष्ट्रवादीच्या माणसाला आणून त्यांच्याकडून कोणी निवडणूक लढवू नये म्हणून त्यांना पक्षात प्रवेश दिला. एका आमदाराची जागा काढण्यासाठी दोन एमएलसी तयार केले. त्यांच्याकडून निवडणुकीची भीती दाखविली जात आहे? आधी ठाकरेंनी नगरसेवक जिंकून दाखवावे. उद्धव ठाकरे पंतप्रधानांवर टीका करतात. विधानसभा लढल्यानंतर बोला. नरेंद्र मोदींच्या बळावर उद्धव ठाकरेही एमएलसी झाले आहेत अशी टिका मोहीत कंबोज यांनी केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आमची कालही तिच भूमिका होती. आजही तिच आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याने ते कोणत्याही गटात सामील झाले तरी त्यांना स्वीकारणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.