कोण केसरकर? नवीन पोपट आहे, मिठू मिठू बोलतो; अरविंद सावंतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सांगितले की, अमित शाह यांनी दिलेला शब्द फिरवला. पलटी मारली. कारण त्यांचं काम होऊन गेलं होतं. ते केंद्रात सत्तेत आले होते.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई: ते कोण केसरकर? (deepak kesarkar) नवीनच पोपट आहे. मिठू मिठू बोलतो. एवढा बोलायला लागला मला आश्चर्य वाटतं. आमच्यासोबत असताना त्यांनी कधीच तोंड उघडलं नव्हतं. आधी काँग्रेसमध्ये होते. नंतर राष्ट्रवादीत (ncp) गेले. मग शिवसेनेत आले, असा टोला खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी मंत्री दीपक केसरकर यांना लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. अरविंद सावंत यांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटकेच निवडून येतील, असा दावाही केला.
मांजर आडवी गेली. अडथळे निर्माण केले तरीही अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा ताईंना संधी मिळाली. कोर्टाकडून महापालिकेवर ताशेरे झाडले गेले. खरंतर आपला कर्मचारी आमदार, नगरसेवक किंवा उद्या सभापती होत असेल तर महापालिकेला अभिमान वाटायला हवा होता. मात्र, महापालिकेने त्या विधवेला त्रास दिला. त्यांना उमेदवारी मिळू नये. त्यांची उमेदवारी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केले. कुठे फेडाल हे पाप, असा संताप अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.
आनंद दिघे हयात असताना महापौर पदाच्या निवडणुकीत आपला पराभव झाला. पराभव झाल्यानंतर ज्यांनी गद्दारी केली त्यांना आनंद दिघेणी कोणती सजा दिली हे सर्वांना माहीत आहे. खोपकर आठवतो ना? ती तेवढ्यापुरती मर्यादित नाही त्याच्यापेक्षा जास्त शासन त्यांनी आपल्या सहकार्यांना केलं. महापालिकेतील निवडून आलेल्या सर्व 32 नगरसेवकांचे राजीनामे घेतले. ठाणे महानगरपालिका पाच वर्ष विरोधी सदस्यांशिवाय चालली. पाच वर्षात निवडणूक लागली नाही. निवडून आलेले सदस्य घरी बसवले, अशी आठवणही सावंत यांनी करून दिली.
यावेळी त्यांनी भाजपचे नेते अमित शाह यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सांगितले की, अमित शाह यांनी दिलेला शब्द फिरवला. पलटी मारली. कारण त्यांचं काम होऊन गेलं होतं. ते केंद्रात सत्तेत आले होते. त्यामुळे गरज सरो वैद्य मरो म्हणून फिरकले नाही. हरियाणाला गेले. तिथे काहीच बोलले नाही. मग कोकणातल्या बटुकला यांच्या घरी गेले. तिथे गेल्यावर मैने तो ऐसा कभी कहाँ ही नही था म्हणाले. अरे तू काय गजनी आहेस का? तू शब्द दिलाय हे तुला सहा महिने आठवलं नाही?; असा संतप्त सवालही त्यांनी केला.