‘मातोश्री’वर महिन्याला 100 कोटी रुपये जायचे; खोक्यांवरून शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप
मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा खळबळजनक दावा, प्रतापराव जाधव यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा: शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटातील वाद काही संपता संपत नाहीये. हे वाद इतके पराकोटीला गेले आहेत की आता दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आधी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) टीका करणार नाही, असं सांगणारे शिंदे गटाचे नेते आता थेट मातोश्रीवर गंभीर आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही तोंडसुख घेतलं जात आहे. आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर हे खोके घेऊन जात होते, असा खळबळजनक दावा प्रतापराव जाधव (prataprao jadhav) यांनी केला आहे. जाधव यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले होते. यावेळी मेहकरमध्ये गुलाबराव पाटलांच रॅली काढून जोरदार स्वागत करण्यात आलं.त्यानंतर हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केले आहेत.
50 खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असत, असं म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवरच गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय. मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा खळबळजनक दावा, प्रतापराव जाधव यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
त्यामुळे या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापतंय का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना 50 खोके एकदम ओके म्हणून हिणवल्या जायचं. मात्र आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट मातोश्रीलाच “शंभर खोके एकदम ओके” तेही दर महिन्याला म्हणून आव्हान दिलं आहे. त्यावर आता शिवसेनेतून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.