PratapRao Jadhav | उद्धव ठाकरेंचा फोटो काढला नाही, पण नेते एकनाथ शिंदेच! खासदार प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह अनेकांनी कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढल्याची सध्या चर्चा आहे. यावर बोलताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, मी अद्याप तरी फोटो काढलेला नाही.
मुंबईः राज्यभरातील बंडखोर आमदार आणि खासदारांनी स्वतःच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवल्याचे वृत्त काल आले. औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी स्वतःच्या कार्यालयातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो काढल्याची चर्चा राज्यभरात सुरु आहे. खासदार प्रतापराव जाधव यांना यावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी त्यांच्या कार्यालयात अजूनही उद्धव ठाकरे यांचा फोटो कायम असल्याचं सांगितलं. तसेच फोटो लावल्याने किंवा काढल्याने कुणी मोठं किंवा छोटं होत नाही. तर विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते, असं वक्तव्य खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आता राज्यभर दौरे सुरु केले आहेत, मात्र असे दौरे त्यांनी आधीच केले असते तर आमदार आणि खासदार तुम्हाला सोडून गेले नसते, असं वक्तव्य खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय.
‘गद्दार कोण हे जनता ठरवेल’
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करत आहेत. या दौऱ्यात ते शिवसेनेतून गेलेल्यांना गद्दार असे संबोधत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, ‘ आदित्य ठाकरे ज्या त्वेषाने आणि आक्रमक बोलतायेत गद्दार म्हणतायेत राज्याचा दौरा करतायेत.. हाच दौरा अडीच वर्ष आधी केला असता आमदार, खासदारांना भेटले असते तर आज ही शिवसेनेवर वेळ आली नसती. शिवसेनेचे नेते तसेच आदित्य ठाकरे आम्हाला गद्दार म्हणत आहेत. मात्र आगामी निवडणुकांमध्ये जनताच याबाबत निर्णय देईल. कुणाची भूमिका योग्य आहे आणि कुणाची नाही, हे जनताच दाखवून देईल, असं उत्तर प्रतापराव जाधव यांनी दिलंय.
सामंतांवरील हल्ल्याचा निषेध
शिवसेना खासदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा मी निषेध करतोय, अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला आणि पक्ष नेतृत्वाच्याही चुका झाल्या. मात्र आम्ही शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे शिवसैनिकांनी वाद निर्माण होऊ नये, असं वागलं पाहिजे, असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलंय.
विचारांची लढाई विचारांनीच
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह अनेकांनी कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढल्याची सध्या चर्चा आहे. यावर बोलताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, मी अद्याप तरी फोटो काढलेला नाही. मी माझ्या कार्यालयात उद्धव ठाकरेंचा फोटो तसाच ठेवलाय. कारण एवढी वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय. फोटो काढला म्हणून किंवा यापेक्षा कोणाचा मोठा फोटो लावला म्हणून महत्त्व कमी होत नसतं. आणि फोटो काढण्याचं काही कारण नाही. आता आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. विचारांची लढाई ही विचारानीच लढायची आहे.