Priyanka Chaturvedi | शिंदे आजारी, फडणवीस दिल्लीत! आम्ही जागेवरच, पळतंय कोण पहा, शिवसेना खासदार प्रियंका चुतुर्वेदींचा टोमणा
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी हजेरी लावत आहेत.
मुंबईः शिंदे आजारी तर फडणवीस दिल्लीत. आम्ही जागेवरच आहोत, पळतंय कोण पहा, असा टोमणा शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी लगावला आहे. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांची प्रकृती बरी नसल्याचे वृत्त समोर आले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तडकाफडकी दिल्लीत गेल्याचीही बातमी धडकली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सारख्या दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून त्यांना टोमणेही ऐकावे लागत आहेत. काँग्रेस खासदार प्रियंका चतुर्वेदींनीही हीच वेळ साधली. एवढी धावपळ केल्यामुळे मुख्यमंत्री आजारी पडले असून त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांच्याच गोटात जास्त हालचाल सुरु आहे, आमचं स्थान स्थिर आहे. शिवसेना स्थिर आहे. अस्वस्थता केवळ शिंदे गटात असल्याचं वक्तव्य प्रियंका चतुर्वेदी यांनी केलंय.
कोर्टाच्या सुनावणीवर काय प्रतिक्रिया?
सुप्रीम कोर्टातील आजच्या शिवसेनेसंबंधी याचिकेच्या सुनावणीवर बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, ‘ एकनाथ शिंदेंच्या बाजूने 6 वकील लढत आहेत. तरीही कोर्टाने त्यांना तिखट प्रश्न विचारले. ही सकारात्मक बाब असल्याचं त्या म्हणाल्या. निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी घेतली तरीही त्याचा अंतिम निर्णय घेऊ नका, असं कोर्टानं बजावलं आहे. ही एक चांगली बाब असल्याचं चतुर्वेदी म्हणाल्या. आता सोमवारच्या सुनावणीत काय होतंय, हे पाहुयात..
शिंदे गट ही शिवसेना नाही तर भाजपा आहे….
एकनाथ शिंदे गटावर टीका करताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, शिंदे गट ही शिवसेना नाही तर भाजपा आहे. यापैकी एक जड भाजपा तर एक हलकी भाजपा आहे. शिवसेना मात्र एकच आहे. ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची.. ही शिवसेना स्थिर आहे. हालचाल फक्त शिंदे गटात आहे. शिवसेना जागेवरच आहे, पळतोय तो शिंदे गट असं वक्तव्य प्रियंका चतुर्वेदी यांनी केलंय.
शरद पवार यांच्या घरी बैठक
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी हजेरी लावत आहेत. मार्गारेट अल्वा या युपीएमच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत.