मुंबईः आगामी महापालिका निवडणुकांसदर्भात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी बीएमसी निवडणूक (BMC Election) शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एकिकडे सुप्रीम कोर्टात शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या खटल्याची सुनावणी अधिक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली असताना शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकांसंदर्भात मोठं विधान आलं आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची, पक्ष चिन्ह कुणाला मिळणार, आमदारांवरील अपात्रतेची कारवाई कोण करणार, आदी प्रश्नाची उत्तरं मिळवण्यासाठी कायदेतज्ज्ञांचे तगडे युक्तिवाद होत आहेत. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांची कोठडी आणखी चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे तर दुसरीकडे बाहेर उद्धव ठाकरेंना शिंदेसेनेत सहभागी होण्याचं आव्हान देत शिंदे गटातर्फे ललकारलं जात आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी केवळ मुंबईच नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुक एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही आमच्यासोबत यावं, अशी आमची अपक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही काल शिवसेनेत होतो, आज आहोत आणि उद्याही राहणार आहोत. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप शिवसेना युती करून लढणार आहे. भाजप शिवसेना युतीचीच सत्ता मुंबई महापालिकेवर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना विरोधात शिंदे सेनेच्या खटल्यावर राहुल शेवाळेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ कोर्टातला आजचा युक्तिवाद चांगला झाला. सोमवारी सर्वोच्च न्यायालय हा खटला घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र यंत्रणा आहे न्यायालयाने मान्य केलंय. निवडणूक आयोगानं ज्या दोन्ही पक्षाची सुनावणी ठेवलेली आहे, त्या संदर्भात कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निर्णय घेऊ नका असं सांगितलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सोमवारी कोर्ट काय सूचना देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजकीय फायद्यासाठी प्रभाग रचनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदल केल्याचा आरोप केला जातोय. यावर बोलताना राहुल शेवाळे म्हणाले. यापूर्वी प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय यापुर्वी राजकीय फायद्यासाठीच घेतला होता. आता प्रभाग रचनेबाबत तक्रारी आल्या म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बदलायचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरेंकडून होणाऱ्या टिकेला आता लोक कंटाळले आहेत. त्यामुळे लोकांनी आता कामावर लक्ष केंद्रित करावं. असंही राहुल शेवाळे म्हणाले.