उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर देणाऱ्या खासदाराची सारवासारव, म्हणाले…. त्या दिवशी आमच्या रक्तात दोष
संजय जाधव यांनी हिंगोलीतील शिवगर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला होता. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने पक्ष संघटनेकडे बघायला पाहिजे होतं किंवा कुणाला तरी बघायला अधिकार द्यायला पाहिजे होता
राजीन गिरी, नांदेड : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यामुळेच शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, या शब्दात ठाकरे पिता-पुत्रांना नुकतंच एका खासदाराने सुनावलं होतं. हिंगोलीत ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचं हे वक्तव्य ऐकून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे मराठवाड्यातून संजय जाधव यांच्या बंडखोरीची चर्चा वारंवार होत असते. अनेकदा ते शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतील, अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र संजय जाधवांनी आपण ठाकरेंसोबतच असल्याचे वारंवार ठामपणे सांगितले आहे. हिंगोलीतील त्यांचं वक्तव्य गाजल्यानंतर आता नांदेडमध्ये त्यांनी आपल्याच वक्तव्याची सारवासरव केलेली दिसून आली. ज्या दिवशी पक्षाशी गद्दारी करेन, त्या दिवशी आमच्या रक्तात दोष आहे, असे समजून घ्या, या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिलं. परभणी मतदारसंघाचे ते खासदार आहेत.
सात जन्म…
संजय जाधव म्हणाले, माझ्या पाठिशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला परभणीत नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते आमदारकी, बाजारसमिती, खासदारकी, शिवसेनेचे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख या सगळ्या पदांवर काम करण्याचं भाग्य लाभलं. एक जन्म काय पण सात जन्म मी हे उपकार फेडू शकणार नाही. आता हे ५० खोके समोर आले तरी माझ्या या उंचीसमोर मला ते ठेंगणे वाटतात. म्हणून पैसे काही कामी येणार नाहीत… ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू, त्या दिवशी आपल्या रक्तात दोष आहे, असं गृहित धरा. ज्या पक्षानं मोठं केलं, त्या पक्षाशी पाईक राहणं आपलं कर्तव्य आहे. ज्या पक्षाने एवढं मोठं केलं, त्या पक्षाचे उपकार सात जन्मही फेडू शकणार नाहीत, हे मी आवर्जून सांगतो.
हिंगोलीत ठाकरेंना घरचा आहेर
संजय जाधव यांनी हिंगोलीतील शिवगर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला होता. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने पक्ष संघटनेकडे बघायला पाहिजे होतं किंवा कुणाला तरी बघायला अधिकार द्यायला पाहिजे होता, ते देऊ शकले नाही किंवा ते स्वतः बघू शकले नाहीत. म्हणून आमच्यावर हा प्रसंग ओढवला. हे सत्य, वस्तुस्थिती आहे. म्हणून यासारख्या चोरांना संधी मिळाली. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर तुम्ही पोराला मंत्री करायला नको होतं आणि पोराला मंत्री करायचं होतं तर तुम्ही मुख्यमंत्री पद घ्यायला नको होतं, ही वस्तुस्थिती होती. तुम्ही दोघांनी खुर्च्या आटवल्यामुळे याला वाटलं… आता उद्या बाप गेला की पोरगं बोकांडी बसेल, त्या पेक्षा वेगळी चूल मांडली तर काय बिघडलं, या भूमिकेतून गद्दारी झाली… असं वक्तव्य संजय जाधव यांनी हिंगोलीत केलं होतं.