राष्ट्रवादीच्या तब्बल सात बड्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी, पक्ष फोडीचा आरोप कितपत खरा?
राज्यात सध्या अजित पवार यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. असं असताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबद्दल मोठा आरोप केलाय. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून राष्ट्रवादीला फोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) पक्ष कसा फुटला? हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं. शिवसेनेतील अनेक नेत्यांवर तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा होता. अनेकांना ईडीचे (ED) समन्स बजावले गेले. काहींच्या चौकशा झाल्या. तर काहींच्या घरी आणि मालमत्तेवर छापेमारी झाली. या सगळ्या घडामोडींदरनम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं बंड पुकारलं. त्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदे यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकटे पडले. त्यांच्या बाजूने फार कमी आमदार आणि खासदार शिल्लक राहिले. या घटनाक्रमकडे पाहता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबद्दल मोठा आरोप केलाय. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून राष्ट्रवादीला फोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे विविध तपास यंत्रणांकडून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांविरोधात कारवाई सुरु आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकून, राष्ट्रवादीला फोडण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊतांनी हा आरोप अशावेळी केलाय जेव्हा अजित पवारांवरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशा चर्चा जोरात सुरु आहेत आणि आता तपास यंत्रणांच्या आधारे राष्ट्रवादीलाच फोडण्याचा डाव असल्याचा दावा राऊतांचा आहे. विशेष म्हणजे राऊत गेल्या 3 दिवसांपासून, राष्ट्रवादीसंदर्भात एकसारखेच संकेत देत आहेत.
राष्ट्रवादीच्या या सात नेत्यांविरोधात ईडी आणि सीबीआयकडून कारवाई सुरु
1) दाऊदशी संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या प्रकरणात, राष्ट्रवादीचे नवाब मलिक जेलमध्ये आहेत. 14 महिन्यांपासून त्यांना जामीन मिळालेला नाही.
2) मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांच्या मागेही ईडी लागलीय. 14 महिन्यांनंतर देशमुखांना जामीन मिळाला आणि ते जेलमधून बाहेर आलेत.
3) साखर कारखान्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफांवर ईडीकडून अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या घरी 3 वेळा ईडीनं छापे मारलेत. अटकपूर्व जामिनासाठी मुश्रीफांनी हायकोर्टात धाव घेतली आणि 24 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
4) राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून अजित पवारांचीही चौकशी सुरु आहे. नुकत्याच दाखल केलेल्या ईडीच्या चार्जशीटमध्ये अजित पवारांचं नाव नाही. मात्र आपल्याला क्लीनचिट मिळालेली नसल्याचं अजित पवारांचं म्हणणंय
5) गँगस्टर इक्बाल मिर्चीसोबतच्या व्यवहारावरुन प्रफुल्ल पटेलांचीही ईडी चौकशी सुरु आहे. मुंबईतल्या सीजे हाऊसमधला फ्लॅटही जप्त करण्यात आलाय
6) पुण्यातल्या कथित भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या मागे ईडी लागलीय.
7) महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणात प्राजक्त तनपुरेंचीही ईडीनं चौकशी केलीय
ईडी आणि सीबीआयचा वापर विरोधकांच्या विरोधात, होत असल्याचा आरोप कायमच होत आलाय. पण ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत.