राज्यात सत्तांतर होणार? शिंदे सरकार औटघटकेचं ठरणार?; संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले…
ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. तेव्हा तुम्ही तोंडाची थुंकी का उडवत होता आणि तरूण नेत्याला का बदनाम करत होता. आता माफी मागा, असं ते म्हणाले.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. दानवे यांनी हे आदेश दिल्याने राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शिंदे सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या कामाला लागलो आहोत, असं सांगितलं आहे. राऊत यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. या दौऱ्याला केवळ बिहार दौरा म्हणून बघू नका. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत.
हा बिहार दौरा नाही. राष्ट्रीय दौरा आहे. तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासोबत राजकीय परिवर्तन केलं आहे. आम्ही महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन केलं होतं. परत एकदा राजकीय परिवर्तन करण्याच्या तयारीत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे, दोन महिन्यात काय होईल सांगता येत नाही. याचा अर्थ त्यांना आमच्या हालचालीची बित्तंबबातमी कळलेली दिसते. भूगर्भात ज्या हालचाली सुरू आहेत, पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत, केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्या कानापर्यंत काही गोष्टी गेल्या असतील, असं सूचक विधान त्यांनी केलं.
तरुण नेत्यांना भेटून त्यांची मजबूत फळी देशात पर्याय म्हणून उभारण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न आहे. देशातील तरुण नेत्यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधायचा आहे. अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधून देशात पर्याय द्यायचा आहे. याकडे हे राज्य म्हणून न पाहता राजकीय रणनीती म्हणून पाहावं, असं ते म्हणाले.
दिशा सालियन हिचा मृत्यू अपघाती असल्याचं सीबीआयच्या अहवालात म्हटलं आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यावेळी ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. तेव्हा तुम्ही तोंडाची थुंकी का उडवत होता आणि तरूण नेत्याला का बदनाम करत होता. आता माफी मागा, असं ते म्हणाले.