Sanjay Raut : 1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवरे आणि भावांना बेवडे बनवणार, संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut : "बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे. हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे. अजित पवारांसारखा नेता असा विचार करत असेल तर ते दुर्देव म्हणावं लागेल" अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली.
“भाजपचं नेतृत्व पंडित नेहरूंवर रोज चिखलफेक करत असले तरी अटल बिहारी वाजपेयी हे काँग्रेसेत्तर नेहरूच होते. दुसरे नेहरू म्हणून अटलबिहारी वाजपेयींना संबोधलं जायचं. नेहरूंनी वाजपेयींना आशीर्वाद आणि मार्गदर्शन केलं. राजधर्माचं पालन कसं करावं हे वाजपेयींकडून शिकावं. हिंदूधर्मीय देश असला तरी सर्वांना घेऊन गेलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. वाजपेयी गेले आणि त्यांची भूमिकाही संपली. वाजपेयींना बाळासाहेब ठाकरे फार मानायचे. शिवसेना आणि भाजपची युती झाली त्याचे प्रमुख शिल्पकार वाजपेयी. आज वाजपेयी नसले किंवा आम्ही भाजपसोबत नसलो तरी आम्हाला वाजपेयींचं स्मरण कायम होतं” असं खासदार संजय राऊत म्हणाले.
लाडकी बहिण योजना तसच 2 लाख कोटीची तूट भरुन काढताना महसूल वाढीसाठी दारुच्या दुकानांचे परवाने वाढवण गरजेच आहे, असं अजित पवार बोलले. त्यावर पत्रकारांनी विचारल्यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, “लाडक्या बहिणींना 1500 हजार देण्यासाठी लाडक्या बहिणीचे भाऊ आणि नवऱ्यांना ते दारूडे करणार आहेत. प्या दारू. 1500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र ते दारूडा करणार असतील तर ते अत्यंत गंभीर आहे”
बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम
“दारूची दुकाने वाढवणार आहेत. ड्राय डे कमी करणार आहेत. शॉप आणि मॉलमधून दारू विकण्याचं प्रपोजल आलं आहे. काही राज्यात घरपोच दारू पोहोचवण्याची स्किम आहे. तीही आणण्याचं चाललं आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी काही करून दारू पोहोचवायची. बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे. हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे. अजित पवारांसारखा नेता असा विचार करत असेल तर ते दुर्देव म्हणावे लागेल. यशवंतराव चव्हाण, फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावणं अजितदादांनी बंद करायला पाहिजे” अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली.
‘1500 रुपयात काही येत नाही’
“भविष्यात लाडकी बहिण योजना बंद करतील. लाखो कोटींचा खर्च आहे. निवडणुकीच्या आधी कोणतेही निकष न लावता मतांसाठी पैसे वाटले. आता निवडणुका झाल्यावर निकष लावता. आता दारूची दुकाने वाढवत आहात. 1500 रुपयांसाठी आपल्या घरात कोणतं विष आणलं जात आहे, ते बहिणींनी पाहिलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले. “40 रुपये लसूण 400 रुपयांवर गेली आहे. 1500 रुपये देता. जेव्हा बहीण मार्केटमध्ये जाते तेव्हा ती थैली रिकामी घेऊन येते. 1500 रुपयात काही येत नाही” असं संजय राऊत म्हणाले.