Chhagan Bhujbal : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
Chhagan Bhujbal : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घटना घडतेय. अजित पवार गटात असलेले छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही एक मोठी बातमी आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत आज छगन भुजबळ अचानक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिलवर ओकवर पोहोचले. या बातमीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. शरद पवार यांनी बारामती येथून फोन केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. छगन भुजबळ यांच्या या भेटीवर आज सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली.
“छगन भुजबळ साहेबांना भेटायला गेले, याबद्दल माहित नाही. हे तुमच्याकडून मी ऐकतेय. मी पुण्यात आहे. माझ्या माहितीप्रमाणे, साहेब आज यशवंतराव चव्हाण सेंटरला जाणार नव्हते. भुजबळ सिलवर ओकला गेलेत, या बद्दल खरच काही मला माहित नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुनील तटकरेंनी काल अजितदादांची तुलना वसंत दादांबरोबर केली, त्यावर ‘ही लोकशाही आहे, प्रत्येकाला काहीही बोलण्याचा अधिकार आहे’ असं सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं.
राष्ट्रवादीत प्रवेश देण्यावर काय म्हणाल्या?
“आम्ही राजकारण जर तर वर करत नाही. आम्ही पॉलिसी मेकर आहोत. आम्ही व्यक्तीसाठी राजकारण करत नाही. जनतेच्या आयुष्यात चांगले बदल करण्यासाठी राजकारण करतो. व्यक्ती केंद्रीत राजकारण करत नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘राष्ट्रवादीत कोण येणार? हा संघटनात्मक निर्णय असेल’ असं त्या म्हणाल्या.
कात्रजच्या चौकातील अतिक्रमणं हटवा
“कात्रजच्या चौकात अनेक अतिक्रमण आहेत. कुणाचाही अतिक्रमण असेल सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होत असेल, तर ते अतिक्रमण काढायला पाहिजे, अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे. सर्वसामान्य पुणेकर ट्रॅफीकमध्ये भरडला जातोय” असं पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या.