नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा, भाजप शिष्टमंडळांचं राज्यपाल कोश्यारींना निवेदन; कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात FIR दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पटोलेंविरोधात राज्यभरात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार अतुल भातखळकर आदी भाजप नेत्यांनी पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जोरदार टीका केलीय. तर मुंबईतील भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत पटोले यांच्याविरोधात कारवाईची मागणी केलीय. त्याबाबतचं एक निवदेन राज्यपालांना देण्यात आलं आहे.
..तर उपोषणाला बसणार- मंगल प्रभात लोढा
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात FIR दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. उद्या बुधवार, 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.
‘काँग्रेसच्या मनात मोदींविरोधात द्वेषाची भावना’
पटोले यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्याकरिता मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची आज राजभवन येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले आहे. मुंबई भाजपा यांचा तीव्र निषेध करत आहे. पंतप्रधान मोदी देशातील जनतेच्या श्रध्दास्थानी आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेस समर्थकांच्या मानात एवढा द्वेष आहे की, देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हे पंजाब घटनेवरून सिध्द झाले असून ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे लोढा यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, उत्तर पूर्व मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष अशोक राव, मुंबई भाजपा प्रवक्ते निरंजन शेट्टी उपस्थित होते.
इतर बातम्या :