आम्ही खेकडे नाही, तर 50 वाघ आहोत, म्हणून तर…; शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
CM Eknath Shinde Group MLA on Uddhav Thackeray : डालड्याचा डबा म्हणा, नाहीतर खेकडे म्हणा, पण आम्हाला...; शिंदे गटाचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर
मुंबई | 26 जुलै 2023 : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित खासदार संजय राऊत यांनी त्यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे. या मुलाखातीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेगटावर टीका केली आहे. शिंदे गटातील आमदार, नेते यांना खेकड्यांची उपमा दिली. त्याला आता शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिलं आहे.
आम्ही खेकडे नाही. तर 50 वाघ आहोत. त्याचमुळे आम्ही उठाव केला आणि बाहेर पडलो. त्यांनी कितीही दुषणं लावली तरी देखील काही फरक पडत नाही. आम्ही त्यांना वारंवार सांगितलं घरी बसू नका. बाहेर पडा. घरी बसून सरकार चालत नाही. पण त्यांनी ऐकलं नाही. आम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पण त्यांच्या आजूबाजूला सगळे लोंबते आहेत, असा पलटवार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
त्यांना वाटतं आम्ही डालड्याचा डब्बा आहे तर डब्यातील डालडा काढा आणि पुरी तळा. त्या पुऱ्या खा. आणखी काय बोलणार उद्धव ठाकरेंना…, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. खेकडे म्हणा , गद्दार म्हणा आणखी काय म्हणायचं ते म्हणा… पण आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मी उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. सन्मान आहे. तो नेहमी राहील. त्यांना बोलण्याचा अधिकार देखील आहे. त्यांना बोलू द्या आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही विकासाचा राजकारण करतोय. विकासाचं राजकारण करून आम्ही त्यांना उत्तर देऊ. जनता आमच्यासोबत आहे. बरेच शिवसैनिक आमच्या संपर्कात आहेत, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
डालडाचा डबा म्हणू द्या. आम्हाला खेकडे म्हणू द्या. काही दुषणं देऊ द्या. काही फरक पडत नाही. त्या एकेकाळी आम्ही त्यांच्यासोबत राहायलो. त्यामुळे आम्ही त्यांचं आदर करतो. पण एवढेच सांगते की आम्ही एका विचारधारेने बाहेर पडलेलो आहोत. एकनाथ शिंदे योग्य पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांची जी विचारधारा होती, ती पुढे घेऊन चालले आहेत. त्या विचारधारावर आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अर्थ नाही, असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.