संजय राऊत यांच्याबाबात प्रश्न विचारताच फडणवीस संतप्त; म्हणाले, माझाही जरा स्तर ठेवा…
Devendra Fadnavis on Sanjay Raut : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन् महाविकास आघाडी...; देवेंद्र फडणवीस यांचे मोठे खुलासे
मुंबई : झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. यात देवेंद्र फडणवीस यांनी बरेच खुलासे केले आहेत. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचे सूत्र संचालक अवधूत गुप्ते याने ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा देवेंद्र फडणवीस संतापले.
संजय राऊत यांच्या जुन्या वक्तव्याची एक क्लिप दाखवण्यात आली. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असं अवधूत गुप्ते याने विचारलं. तेव्हा मला वाटलं नव्हतं की तुम्ही अशाही माणसाला मला उत्तर द्यायला लावाल म्हणून… माझाही स्तर ठेवा, असं फडणवीस म्हणाले.
दाखवण्यात आलेली व्हीडिओ क्लिप काय आहे?
संजय राऊत यांनी भाजपचे नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. मागे झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्याची क्लिप फडणवीस यांना दाखवण्यात आली.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईडीला पत्र लिहावं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यामध्ये झाकीर नाईक यांच्याकडून पैसे कसे येतात. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांच्याकडे माहिती नसेल तर त्यांना ही माहिती आम्ही देऊ, असं राऊत म्हणाले होते.
दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी 500 कोटींची मनी लाँड्रींग केलीय. अख्खा कारखाना लाटला. फडणवीस काय करत आहेत?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला. हा व्हीडिओ देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्यात आला.
फडणवीस यांचं उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं. हातात कागद धरत संजय राऊत यांनी एक हजार कोटींना भ्रष्टाचार केला. ईडी काय करतेय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा महाविकास आघाडीतील नेत्यांनी पातळी सोडली. त्यांनी खालच्या पातळीवर जात टीका केली. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कोणता विरोधक जास्त साधा, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि सरळ वाटतो? उद्धव ठाकरे की अरविंद केजरीवाल?, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल दोघेही मला जिलेबीसारखे सरळ वाटतात, असं त्यांनी उत्तर दिलं.