Shivaji Park Dussehra Melava : शिवाजी पार्कबाबत आज हायकोर्टात युक्तिवाद, शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा? आज निर्णय!
High Court on Shivaji Park : 1966 पासून म्हणजेच शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच केला जातोय. दरम्यान, यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही, असा प्रश्न उभा राहिलाय.
मुंबई : शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पालिकेने कुणालाच परवानगी न दिल्यानं आता दसरा मेळाव्याचा (Dussehra Melava Issue) वाद मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पोहोचलाय. आज या वादावर सुनावणी पार पडेल. शिवसेनेच्या वतीने आणि शिंदे गटाच्या वतीने परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आल्यात. या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडेल. संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं या सुनावणीकडे लक्ष लागलंय. आज दुपारी या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यताय.
शिवसेनेची सुधारीत याचिका
शिवसेनेच्या वतीने मुंबई हायकोर्टात सुधारीत याचिका दाखल करण्यात आलीय. महानगर पालिकेने गुरुवारी शिवाजी पार्कवर कुणालाच परवानगी देता येणार नाही, असं म्हटलंय. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत परवानगी नाकारण्यात आली होती. पालिकेनं दिलेलं कारण पाहता अखेर शिवसेनेच्या वतीने गुरुवारी सुधारीत याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज युक्तिवाद पार पडेल.
शिंदे गटाचीही याचिका
दरम्यान, गुरुवारी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली. दरवर्षीप्रमाणे सदा सरवणकर हेच शिवसेनेच्या वतीने पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करत होते. खरी शिवसेना आपणच आहोत, असा दावा करत सरवणकर यांच्या माध्यमातून शिंदे गटानेही हायकोर्टात याचिका दाखल केलीय.
1966 पासूनचा इतिहास बदलणार?
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच सत्तासंघर्षाचा वाद पेटलाय. त्याचे पडसाद शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या वतीने शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेण्यात आलीय.
पाहा व्हिडीओ : स्पेशल रिपोर्ट : शिवतीर्थासाठी शेवटची आशा
1966 पासून म्हणजेच शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच केला जातोय. दरम्यान, यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही, असा प्रश्न उभा राहिलाय. तसंच जर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी हायकोर्टानेही नाकारली, तर दुसरीकडे दसरा मेळावा घेण्याचीही चाचपणी शिंदे आणि ठाकरे यांच्याकडूनही सुरु करण्यात आलीय. मात्र शिवसेना नेते अनिल परब यांनी पर्यायी जागेचा कोणताही विचार केलेला नाही, असं माध्यमांशी बोलताना म्हटलंय.
कोण बाजू मांडणार?
अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय आणि वकील जोएल कार्लोस यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आलेली होती. त्यावर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी एक सुनावणी पार पडली होती. सुधारीत याचिका दाखल करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी गुरुवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज पार पडणार आहे.