मुंबई : “मोदीसाहेबांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत. राज्यमंत्र्यांना किती अधिकार व कितीजण धोरण ठरवत आहेत, हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही”, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला आहे. 15 ऑगस्टपासून रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वेमंत्रालयाकडे आला नाही, अशी टिप्पणी रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर पत्रकारांनी विचारले असता नवाब मलिक यांनी जोरदार टीका केलीय. (Nawab Malik criticizes Minister of State for Railways Raosaheb Danve)
रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही. मात्र, बोलून कामे होत नसतात. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे. त्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना 15 ऑगस्टपासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहेच. 8 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही रावसाहेब दानवेंवर पलटवार केला आहे. राज्य सरकारने लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केली असेल. रावसाहेब दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आता लोकलसाठी कोणाशी चर्चा करायची? चर्चाच करायची असेल तर कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करू. दानेंशी चर्चा करायची गरज नाही, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची स्थितीही आता आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवासी तपासून आत सोडण्यात येईल. आम्ही लोकल सुरू करण्यास सज्ज आहोत. मात्र, प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. ही राज्याचीही जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. आमची कसली नाराजी नाही. उलट आम्ही खूश आहोत. ज्या अडचणी येतील त्या चर्चेतून सोडवता आल्या असत्या, असंही दानवे म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाचं मनसेकडून पहिल्यांदाच जाहीर स्वागत; काय आहे मनसेचं ट्विट?
Nawab Malik criticizes Minister of State for Railways Raosaheb Danve