Navneet Rana : मुंबई महापालिका नवनीत राणांच्या खारमधील घराची तपासणी करणार! नोटीसही पाठवली
घरात मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम, काही नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेनं तपासासाठी नोटीस पाठवली आहे. 4 मे रोजी मुंबई महापालिकेचं पथन राणा दाम्पत्याच्या घरी जाणार आहे.
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आणि आता जामिनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी राणा दाम्पत्याचा अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण राणा यांच्या खारमधील घराची मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) तपासणी करणार आहे. तशी नोटीसच मुंबई महापालिकेकडून बजावण्यात आली आहे. घरात मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचे बांधकाम, काही नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेनं तपासासाठी नोटीस पाठवली आहे. 4 मे रोजी मुंबई महापालिकेचं पथन राणा दाम्पत्याच्या घरी जाणार आहे.
राणा दाम्पत्याच्या जामिनावर बुधवारी निर्णय
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा तुरुंगातील मुक्काम आता बुधवारपर्यंत वाढला आहे. कारण राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आता बुधवारी दिला जाणार आहे. आज वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवल्याचं सांगितलं आहे. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्ट दुसऱ्या प्रकरणांमध्ये व्यस्त होती. तरीही थोडा फार वेळ देत कोर्टानं निकाल वाचनास सुरुवात केली आहे. मात्र वेळेअभावी आज कोर्ट निकाल देऊ शकलं नाही. त्यामुळे आता या प्रकरणावर बुधवारी निर्णय येण्याची अपेक्षा आहे. उद्या रमजान ईदची कोर्टाला सुट्टी आहे. चार तारखेला निकाल वाचन होऊन निर्णय दिला जाईल. पहिल्या सत्रातच कोर्ट निकाल देईल, असं मर्चंट यांनी सांगितलं.
आज कोर्टात नेमकं काय घडलं?
कोर्टाच्या व्यस्त कामकाजामुळे आणि अपुऱ्या वेळेमुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत या प्रकरणाचं निकाल वाचन पूर्ण होईल. न्यायाधीश रोकडे यांचं खंडपीठ हा निर्णय देणार आहे. दरम्यान, शनिवार पासून या निर्णयाचा निकाल प्रलंबित आहे. शनिवारीही वेळेअभावी निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा व्यस्त कामकाज आणि वेळेअभावी या प्रकरणाचा निकाल आता बुधवारी दिला जाणार आहे. आज 3 वाजता या प्रकरणाचा निकाल येणं अपेक्षीत होतं, पण न्यायाधीश म्हणाले की 5 वाजता निकाल दिला जाईल. 5 वाजता न्यायाधीश रोडके जेव्हा कोर्टात येऊन बसले तेव्हा त्यांनी निकाल बुधवारी दिला जाईल असं सांगितलं. कारण उद्या रमजान ईदची सुट्टी आहे आणि कोर्ट बंद असणार आहे. त्यामुळे नियमित कोर्ट बुधावारी सुरु होईल आणि तेव्हाच राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर निकाल येईल. त्यामुळे आता अजून दोन दिवस राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.