महापालिका प्रभाग रचनेत पुन्हा बदलाची शक्यता! बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
दोन सदस्यीय प्रभाग रचना असावील असा ठरावही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रभाग रचनेत बदल होण्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग रचनेची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. मात्र, महापालिकेतील 3 सदस्यीय प्रभार रचनेला काँग्रेसचा विरोध आहे. दोन सदस्यीय प्रभाग रचना असावील असा ठरावही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रभाग रचनेत बदल होण्याचे संकेत दिले आहेत. (Balasaheb Thorat’s signal for change in Municipal Ward structure)
महापालिकेत 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. मात्र, 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय झालेला आहे. याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असं बंधन घालू नका. बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर परत एकदा चर्चा होऊ शकते. आमच्या कार्यकारिणी बैठकीत दोन सदस्यीय प्रभाग असावा अशी चर्चा झाली आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असला तरी परत चर्चा होऊ शकते, अशा शब्दात प्रभाग रचनेत पुन्हा बदल होऊ शकतात, असे संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत.
काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा ठराव
मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, या प्रभाग रचनेला काँग्रेसनं विरोध केलाय. आज काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या कार्यकारिणी बैठकीत आता सर्व महापालिकांसाठी 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतही मतभेद झाल्याची चर्चा
प्रभाग रचनेवरुन मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खल झाल्याची माहिती मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे चार सदस्यी प्रभाग रचनेच्या बाजूने होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना द्विसस्यीय प्रभाग रचना हवी होती. हे नेते आपल्या मागणीवर अडून होते. मात्र शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यममार्ग काढत 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
हे सगळं राजकीय फायद्यासाठी सुरु – राज ठाकरे
‘आपल्याला पद्धतीने, आपल्या सोयीने प्रभाग तयार करणे आणि त्यातून निवडणुका जिंकणे. पण या सगळ्याचा त्रास लोकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायचं सोडून 3 – 3 उमेदवारांना मतदान का करायचं? म्हणजे सर्व जनतेला गृहित धरायचं, आपल्याला हवे त्या पद्धतीनं प्रभाग करायचे, खरं तर हे योग्यच नाही, कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे. इथं महाराष्ट्राचा कायदा वेगळा आणि देशाचा कायदा वेगळा असं काही आहे का? हे दोनचे प्रभाग, तीनचे प्रभाग, चारचे प्रभाग कसला खेळ चालू आहे? उद्या तुम्ही तीन-तीन आमदार, तीन-तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? हे सगळं यांच्या फायद्यासाठी सुरु आहे’, असा आरोपही राज ठाकरेंनी केला होता.
इतर बातम्या :
‘युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या’, रोहित पवारांचा घरचा आहेर
Video : ‘मोदींचा प्रत्येक पंपावर फोटो, ते म्हणत असतील बघ तुझी कशी जिरवली!’ अजित पवारांचा खोचक टोला
Balasaheb Thorat’s signal for change in Municipal Ward structure