अपक्ष लढणार का? निराश आहात का? दबाव आहे का?; मुरजी काकांकडून तीन प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात
मी अपक्ष लढणार नाही. पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. ऋतुजा ताईला मी शुभेच्छा देतो. केंद्र आणि राज्यातील नेत्याने माघार घ्यायचं ठरवलं.
मुंबई: अखेर मुरजी पटेल (murji patel) यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी तशी घोषणा केली आहे. बावनकुळे यांच्या घोषणेनंतर मुरजी पटेल आता काय करणार असं सांगितलं जात होतं. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या प्रतिक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच पटेल यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. आमच्यासाठी पक्षादेश महत्त्वाचा असून मी नाराज नाही, अशी प्रतिक्रिया मुरजी पटेल यांनी व्यक्त केली आहे.
मुरजी पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. भाजप माझी आई आहे. भाजपसाठी मरेपर्यंत काम करत राहू. पक्षाचा आदेश आमच्यासाठी शिरसांवद्य आहे. पदावर असो, नसो आम्ही अंधेरीची सेवा करू. अंधेरीच्या लोकांनी साथ दिली. त्यांच्यासोबत काम करत राहीन. मी आधीही काम करत होतो. नंतरही काम करेल. आधीपेक्षा मी अधिक ताकदीने काम करेल, असं मुरजी पटेल म्हणाले.
मी अपक्ष लढणार नाही. पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. ऋतुजा ताईला मी शुभेच्छा देतो. केंद्र आणि राज्यातील नेत्याने माघार घ्यायचं ठरवलं. मी तात्काळ आदेश मानला. पार्टीचा आदेश येतो. तो पाळायचं काम आमचं असतं.
आम्ही भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहोत. आमच्यासाठी भाजप आमची आई आहे. पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबद्दल निराशा नाही. भाजपचा कार्यकर्ता कधी निराश होत नाही. माझ्यावर बिलकूल दबाव नाही, असंही त्यांनी संगितलं.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचा निर्णय झाल्यावर. कुणीही पक्षाच्या विरोधात जात नाही. मुरजी पटेल युतीचे उमेदवार होते. त्यांच्यावर शंका घेण्याचं कारणच नाही. ते पक्षाचा आदेश पाळतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
51 टक्क्याची लढाई आम्ही जिंकलो असतो. आम्ही तयारी केली होती. आम्ही रणांगणात होतो. वॉर्डातील अपेक्षित मते मिळणारच होते. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक आम्ही 100 टक्के जिंकणार होतो. साधारण एक वर्ष विधानसभा आणि लोकसभेला आहे. एक दीड वर्षा करीता निवडणूक का लढवावी? असा आमचा सवाल होता. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असं बावनकुळे म्हणाले.
भाजपने अनेकदा असे निर्णय घेतले आहेत. आमदाराचं निधन होतं. तेव्हा माघार घेतो. आमची संस्कृती आहे. ही संस्कृती आजची नाही. अटलजींच्या काळापासूनची आहे, असंही ते म्हणाले.