Maharashtra Election 2024 : उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला विजयी करण्याचे मौलानाचं आवाहन VIDEO
Maharashtra Election 2024 : सध्या सुरु असलेल्या निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरे यांच्यावर ते हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेल्याचा आरोप होत आहे. महाविकास आघाडीच्या विजयासाठी मशिदीमधून फतवे निघत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. या प्रचारामध्ये महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाने हा मुद्दा लावून धरला आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेल्याचा आरोप होत आहे. नुकत्याच एका प्रचारसभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या विजयासाठी मशिदीमधून फतवे निघत असल्याचा आरोप केला होता.
आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचं एका मौलानाने आवाहन केलय. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुनील प्रभू आणि आमदार सचिन अहिर हे मौलानांसोबत बसलेले दिसले. मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील प्रभू यांना मतदान करण्याचे मौलानाने आवाहन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये कोण दिसतय?
या व्हिडिओमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिंडोशीचे उमेदवार सुनील प्रभू आणि आमदार सचिन अहिरही दिसत आहेत.काल रात्रीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उर्दू पत्रकावर आणि वर्सोवा विधानसभेत मुस्लिम उमेदवार उभा केल्यावरून ठाकरे गटावर टीका केली होती. सध्या सत्ताधारी महायुतीकडून ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हे तो सेफ हैं’ या मुद्यांभोवती प्रचार केंद्रीत केला आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे.