सिंधुदुर्गातील निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ, भाजप-शिंदे गटाचा दणदणीत विजय
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात युतीच्या माध्यमातून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय.
गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात युतीच्या माध्यमातून झालेल्या पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केल्याची बातमी समोर आलीय.
या निवडणुकीत भाजप-शिंदे गट युतीने 15/0 असा दणदणीत विजय मिळवलाय. विशेष म्हणजे युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघच्या निवडणुकीत श्री देव पाटेकर सहकार परिर्वतन पॅनलने सहकार वैभव पॅनलचा भुईसपाट केलाय. त्यामुळे दीपक केसरकरांना खरेदी विक्री संघ आपल्याकडे राखण्यात यश आलंय.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरुनही राजकारण तापलं
दुसरीकडे सिंधुदुर्ग पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आलाय. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरुनही वातावरण तापल्याची माहिती समोर आलीय.
जळगाव जिल्हा दूध संघात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचं वर्चस्व आहे. पण त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन सर्वपक्षीय पॅनल बनवून खडसेंना एकटं पाडण्याच्या प्रयत्नात आहेत.
विशेष म्हणजे त्यासाठी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गु्प्त बैठक घेतलीय. या बैठकीची खडसे आणि त्यांच्या समर्थकांना कानोकान खबर नव्हती.
हेही पाहा :