Sharad Pawar : सभागृहाबाहेर पक्षविरोधी विधान, कृती केली तरी व्हीप लागू होतो, पवारांनी दिला सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्णयाचा दाखला
Sharad Pawar : शिवसेनेचा एक ग्रुप आसामला आहे. त्यांचं एक स्टेटमेंट आलंय. त्यांना सत्ता परिवर्तन हवंय. त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. गेलेले लोक परत आले तर त्यांच्या भूमिकेत बदल होईल असं शिवसेनेला वाटतं.
नवी दिल्ली: सभागृहामध्ये व्हीप पाळला नाही तर तो व्हीपचा भंग ठरतो आणि पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, सर्व सामान्य समज आहे. व्हीप दिल्यानंतर हाऊसमध्ये त्याचा भंग केला तरच त्यांच्यावर कारवाई होते असं आम्हालाही वाटत होतं. पण सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आहे. आमदार, खासदारांनी विधानसभा किंवा संसदेच्या बाहेर पक्षाच्या विरोधात स्टेटमेट दिलं किंवा वेगळं पाऊल उचलंल तर त्यांनाही व्हीप लागू होतो. मला वाटतं या लाईनवर शिवसेना (shivsena) जाईल, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. याबाबतचा निर्णय राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) शिक्कामोर्तब केलं होतं. असंही पवार यांनी सांगितलं. शरद पवार (sharad pawar) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं.
शिवसेनेचा एक ग्रुप आसामला आहे. त्यांचं एक स्टेटमेंट आलंय. त्यांना सत्ता परिवर्तन हवंय. त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. गेलेले लोक परत आले तर त्यांच्या भूमिकेत बदल होईल असं शिवसेनेला वाटतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका ही शिवसेनेला पाठिंबा मिळेल, असं शरद पवार यांनी सांगितलं. शिंदे यांना नवं सरकार हवं आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भेटले. आम्ही आघाडी सरकार स्थापन केलं. त्याला सहयोग देण्याचा निर्णय घेतला. आज आमची आघाडी आहे. आणि ती कायम राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तर निवडणुका होतील
बंडखोरांना या ठिकाणी पर्यायी सरकार आणायचं आहे. एवढ्या मेहनतीने त्यांनी लोक इथून तिथे नेले. त्यात त्यांना यश कसे येईल? राष्ट्रपती राजवटीची शक्यता वाटत नाही. पण राष्ट्रपती राजवट लागली तर निवडणुका होतील, असा माझा अंदाज आहे. खात्रीशीर माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यपालांकडे दावा करत नाही
ते नंबर असल्याचं सांगत आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे तर मग ते तिकडे का बसले आहेत? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. संख्याबळ आहे तर मुंबईत येऊन राज्यपालांकडे दावा का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला. अडीच वर्ष ते आमच्यासोबत होते. राष्ट्रवादीसोबत होते. अडीच वर्षात राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही. आता का झाला आहे? हे केवळ कारण आहे. स्वत:ला डिफेन्ड करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
भाजपचाच हात
आमदार घेऊन जाण्यासाठी जी राज्ये निवडली गुजरात आणि आसाम. तिथे सत्ता कुणाची आहे? भाजपची. भाजप यात कुठपर्यंत आहे हे मला माहीत नाही. पण ग्राऊंडलेव्हला स्पोर्ट मिळतोय ते पाहून त्यांचा संबंध असू शकतो. एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. असं शिंदे म्हणाले होते. माझ्याकडे राष्ट्रीय पार्टीची यादी आहे. त्यात राष्ट्रवादी सीपीएम, सीपीएम आणि तृणमूलचा शिंदेंना पाठिंबा नाही. मग राष्ट्रीय पक्ष कोणता उरला?, असा उलट सवालही त्यांनी केला.
आम्ही शिवसेनेसोबतच
आमची लाईन क्लिअर आहे. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार. आमची कमिटमेंट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत आहे. ते आमदार आज ना, उद्या येतील. त्यांना काय काय आश्वासने दिली किती पूर्ण केल्या हे सर्व शिंदे आणि इतर लोकांनाच माहीत. आम्हाला माहीत नाही, असंही ते म्हणाले.