Manoj Jarange Patil : ‘या उपोषणात माझा शेवट झाला, तरी…’ मनोज जरांगे आता आर-पारच्या तयारीत
Manoj Jarange Patil : "मराठ्यांमुळे राज्यात सरकार आले आहे, कुण्या आमदाराने म्हणावे आम्हाला मराठ्यांनी मतदान केले नाही. मी सरकारबाबत अशावादी आहे. आमचे समीकरण जुळले नाही, म्हणून नाही तर सुफडा साफ झाला असता. मी लोकसभेला आणि विधानसभेला म्हणलो नाही की, याला पाडा किंवा त्याला पाडा" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्यात यावे. जे पुरावे सापडले आहेत, त्या आधारे आरक्षण देण्यात यावे. सग्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी या अधिवेशनात करावी. या राज्यातील शेतकरी मराठा म्हणजे कुणबी आहेत आणि 83 क्रमांकावर तसे आहे आणि त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे” अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली. “मराठा समाजातील तरुणांवर ज्ये केसेस झाल्या, त्या परत घेण्यात याव्यात” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. “राज्य सरकारने शिंदे समिती गठीत केली, त्या समितीला मुदतवाढ दिली. ती समिती काम करत नाही, सरकारला विनंती आहे, शिंदे समितीला नोंदी शोधायच काम सुरु करायला लावा” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
“सरकारने मराठा समाजाला EWS मधून आरक्षण तात्काळ लागू करावे. ओबीसी आणि ईसीबीसी तिन्ही आरक्षण सुरु ठेवावे. उद्या आमच्या मागण्यांचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. अंतरवली सराटीमध्ये 25 जानेवारीला उपोषण सुरू करणार आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शेवटची विनंती आहे, तुम्ही आम्हाला धोका दिला आहे. आम्ही तुमच्या विरोधात ब्र शब्द काढला नाही. राज्यातील मराठा समाजाने 25 जानेवारी पूर्वी सर्व कामे उरकून घ्यायचे आहे. उपोषणाला बसणारे किंवा पाठिंबा देणाऱ्यांनी आपल्या सर्व वस्तू घेऊन अंतरवाली सराटीमध्ये यायचे आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘मुलांची मागणी आहे, म्हणून आम्ही ews मागतो’
“आता आरक्षण घेतल्याशिवाय अंतरवाली सोडायची नाही. मी मरायला तयार आहे. मराठा समाजाचा अपेक्षा भंग कधी होऊ देणार नाही. उपोषण केल्यामुळे मला त्रास होतो आणि या उपोषणात माझा शेवट होऊ शकतो. माझा शेवट झाला, तरी मी मॅनेज होणार नाही, फुटणार नाही” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “सर्वात महत्वाचे आम्हाला आरक्षण ओबीसीमध्ये पाहिजे, मुलांची मागणी आहे, म्हणून आम्ही ews मागतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.