माझी बायको ब्राह्मण, तिच्या सोयऱ्यांनाही आरक्षण देणार का?; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं आंदोलन उभं करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर महायुतीतूनच टीका होताना दिसत आहे. भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही सत्ताधारी आमदार करत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीत दोन गट असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
अक्षय मंकनी, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते अजूनही आक्रमक झालेले आहेत. ओबीसी नेत्यांनी सरकारच्या नोटिफिकेशन्स विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे ओबीसींच्या संतापाचा सामना सरकारला करावा लागणार आहे. सरकारने सगेसोयऱ्यांबाबतचं काढलेलं नोटिफिकेशनच चुकीचं असल्याचं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर माझी बायको ब्राह्मण आहे. तिच्या सोयऱ्यांनाही ओबीसी आरक्षण देणार आहात का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. मागासवर्गीय महिलेने सवर्ण व्यक्तीसोबत लग्न केले तर आईची जात लावण्यात यावी, आणि मराठा समाजाला सगेसोयरे प्रमाणे आरक्षण दिल्यास आमच्या सारख्या वंजारी समाजासह इतर जातीतील महिलांना देखील सग्यासोयऱ्याच्या निकषानुसार आरक्षण द्यावे. माझी बायको ब्राम्हण आहे मग तिच्या नातलगांना देखील आरक्षण देणार का?, असा सवालच जितेंद्र आव्हाड यांनी केला.
आरक्षण द्या, पण…
मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवारांनी केली होती. मराठा समाजाला आरक्षण द्यावे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे ही आमची पूर्वीपासून मागणी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आव्हाड संतापले
यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकारच्या प्रतिनिधींनी 75 वर्षाच्या भुजबळांना एकटं पाडले. इतर मंत्र्यांनी विरोध का केला नाही?, असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
ते तुम्हाला…
यावेळी त्यांनी शंकराचार्यांवरही जोरदार टीका केली. मनुवाद्यांच्या डोक्यातून जातीयवादाचे खूळ अजूनही गेलेले नाही. त्यांना राहून- राहून मनुस्मृती आठवतच असते. म्हणूनच ते काहीबाही बरळत असतात. त्यातूनच स्पष्ट होते की, जाता जात नाही ती “जात” असते. बहुजनांनी आता तरी जागे व्हावे. त्यांनी तुम्हाला कितीही मोठेपणा दिला तरी ते तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्हाला ते शूद्रच समजणार, असं आव्हाड यांनी म्हटलंय.