सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत कारण सांगितलं…
सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार...
नागपूर : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे.त्याआधी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं. पण विरोधकांनी यावर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधकांच्या बहिष्काराचं नाव सांगितलं.
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्दे मांडले.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरूषांचा अवमान केला जातोय. हे वारंवार घडतंय. ही वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं विधान कर आक्षेपार्ह आहे. त्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही. त्यांच्यानंतर भाजपचे नेतेही अशीच वक्तव्य करत आहेत. याचा आम्ही विरोधक म्हणून निषेध करतो, असं अजित पवार म्हणालेत.
कर्नाटक सीमाप्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहे. पण सध्याचं सरकार आल्यावर तो सुटण्याऐवजी तो अधिक चिघळला. उलट महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करू लागले.अशी हिंमत याआधी कुणाची झाली नव्हती पण आता हे सगळं घडतंय. आमचा विकास होणार नसेल तर आम्ही इतर राज्यात जाऊ अशी भूमिका काही गावं घेऊ लागली, हे शिंदे फडणवीस सरकारचं अपयश आहे, असं अजित पवार म्हणालेत.
सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्ताव मांडतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलंय. सीमावादावर प्रस्ताव मांडल्यास त्या प्रस्तावाला आम्ही पाठिंबा देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
उद्या सोमवार 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. 29 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल. कोरोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिल अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूरमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. नागपुरात जागोजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत.