नागपुरात कोंबिंग ऑपरेशन, 20 तलवारींचा साठा जप्त
नागपूर : नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे उद्या (11 एप्रिल) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपूरातील बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत पोलिसांनी तलवारीचा साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 20 तलवारी जप्त केल्या. नागपुरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला आहे. असं असताना सापडलेल्या […]
नागपूर : नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे उद्या (11 एप्रिल) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपूरातील बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत पोलिसांनी तलवारीचा साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 20 तलवारी जप्त केल्या.
नागपुरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला आहे. असं असताना सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. समाजकंटकांकडून मतदान प्रक्रियेत खोडा घातला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन पाचपावली पोलिसांनी ही कारवाई केली.
निवडणुकीच्या काळात झोपडपट्ट्यांमधील अवैध धंदे करणारे, दारु विक्री करणारे आणि गुंडांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. रात्रीच्या वेळी झोपडपट्ट्यांमध्ये पोलीस कसून तपासणी करीत आहेत. पाचपावलीचे पोलीस अशाच प्रकारे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत कोंबिंग ऑपरेशन केलं. कुख्यात गुन्हेगार प्रणय सुधाकर पाटील आणि संग्राम ऊर्फ राजा पाठक यांनी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांची जमवाजमव केल्याचं पोलिसांना कळलं. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि 20 तलवारी जप्त केल्या.
पहिल्या टप्प्यात नागपुरात मतदान
पहिल्या टप्प्यात म्हणजे उद्या (11 एप्रिल) महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाशिम या 7 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लढत नागपुरात होणार असून, भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात आहेत.